विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा शिक्षणासाठी क्रीडा प्रेमींचा लढा – चांदा येथील शाळेला अद्याप मैदान व क्रीडा शिक्षक नसल्याची शोकांतिका !!
नेवासा तालुका प्रतिनिधी // सचिन मस्के
चांदा येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळासाठी स्वतंत्र मैदान व नियमित क्रीडा शिक्षक उपलब्ध करून देण्यात प्रशासनाकडून गंभीर दिरंगाई होत असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून सातत्याने तक्रारी, निवेदने, पाठपुरावे व आंदोलन करूनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
सदर विषयाबाबत नागरिक व युवकांनी आपले सरकार पोर्टल तसेच तक्रार निवारण प्रणाली अंतर्गत तक्रार क्रमांक Dist/ZPAH/2022/4964 दाखल केली होती. तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, व संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी लेखी निवेदने देण्यात आली आहेत.
याशिवाय ऑल इंडिया यूथ फेडरेशन (AIYF) व स्थानिक युवकांनी दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी जाहीर उपोषण करून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले होते.
शाळेत सध्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून उपलब्ध मैदान अपुरे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व क्रीडाविषयक विकास खुंटत आहे. तसेच अनेक वर्षांपासून क्रीडा शिक्षकांची जागा रिक्त असल्यामुळे खेळाचे तास अनियमित होत आहेत.
या गंभीर परिस्थितीमुळे पालक, विद्यार्थी व युवकांमध्ये तीव्र असंतोष आहे. इतक्या कालावधीनंतरही निर्णय न होणे ही प्रशासनाची उदासीनता दर्शवते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
मागण्या :
विद्यार्थ्यांसाठी तातडीने स्वतंत्र व सुरक्षित खेळाचे मैदान उपलब्ध करावे
शाळेत नियमित क्रीडा शिक्षकाची त्वरित नेमणूक करावी
तक्रार क्रमांक Dist/ZPAH/2022/4964 बाबत लेखी कार्यवाही अहवाल जाहीर करावा
जर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युवक व पालकांनी दिला आहे.








