पशुवैद्यकीय दवाखाना फक्त नावालाच, औषधे उपलब्ध नसल्याने पशुपालक वैद्यकीय सेवेपासून वंचित .
घोडेगाव चांदा येथील पशुवैद्यकीय केंद्रात औषधाचा तुटवडा.
नेवासा तालुक्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये औषधे उपलब्ध नसल्याचे कारण देत पशुवैद्यकीय अधिकारी पशुपालकांना वैद्यकीय सेवा देत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. चांदा घोडेगाव अशा पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये मोठे कार्यक्षेत्र असूनही डॉक्टरांकडून औषध नसल्याचे कारण दिले जात आहे. प्रशासनाकडून येणाऱ्या औषधांची विल्हेवाट नेमकं कुठे लावली जाते याचा तपास जिल्हाधिकारी यांनी घ्यावा व दोषी डॉक्टरंवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पशुपालकांच्या वतीने शासनाला करण्यात येत आहे .यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना नेवासा तालुक्यातील चांदा येथील पशुपालक सचिन म्हस्के यांनी दिले आहे.
पशुधनाच्या बाबतीत जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याला सर्वतोपरी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे.यावर तातडीने निर्णय घेऊन योग्य ती उपाययोजना केली जाईल की केवळ बघ्याची भूमिका घेतली जाईल असा प्रश्न आता पशुपालकांपुढे उभा राहिला आहे .एकीकडे सुरू असलेल्या लंपी आजारामुळे अगोदरच शेतकरी मेटाकोटीस आलेला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करून पशुपालकांना न्याय मिळावा अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे व जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे करण्यात आली आहे








