आयसीआयसीआय फाउंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठात सामंजस्य करार
*आयसीआयसीआय फाउंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठात सामंजस्य करार*
*नैसर्गिक शेती पद्धतीवर आधारित संशोधनावर अधिक भर देणे काळाची गरज*
*– कुलगुरू डॉ. विलास खर्चे*
*राहुरी विद्यापीठ, मंगळवार, दि. 13 जानेवारी, 2026*
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कार्यव्याप राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारलेला असून विद्यापीठाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय बेंचमार्क निर्माण केले आहेत. विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत संसाधने मर्यादित होत चालली असून ती टिकवून ठेवण्याची मोठी गरज आहे. विशेषतः कोविड काळानंतर संशोधनासाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडे अपार बौद्धिक क्षमता असूनही निधीअभावी संशोधन कार्यात मर्यादा येत आहेत. तसेच जमीन आरोग्याच्या समस्या आणि हवामान बदलासारख्या वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती पद्धतीवर आधारित संशोधनावर अधिक भर देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाची कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
कृषी महाविद्यालय, पुणे येथे आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या उपस्थितीत संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के आणि आयसीआयसीआय फाउंडेशनचे प्रकल्प संचालक श्री. दीपक पाटील यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, कृषी महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर, कृषी विज्ञान संकुल काष्टी मालेगांवचे डॉ. सचिन नांदगुडे, आय. सी. आय. सी. आयचे पदाधिकारी श्री. चेतन पाटील, श्री. स्वप्निल ढाकळे व श्री. नितीन गुरव उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की या सामंजस्य कराराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग विद्यापीठातील आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात येईल. या सामंजस्य करारातून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या माध्यमातून योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. दीपक पाटील यांनी सांगितले की, आयसीआयसीआय बँक देशातील अग्रगण्य बँकांपैकी एक असून उपजीविका, पर्यावरण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये सीएसआर निधीतून भरीव योगदान देण्यासाठी बँक सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने भारतीय कृषी संशोधन परिषद तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विविध संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी दूरगामी आणि सकारात्मक सहकार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले की आयसीआयसीआय सारख्या विश्वासार्ह आणि दर्जेदार दातृत्व संस्थांच्या सहकार्याचा प्रभावी लाभ घेण्यासाठी विद्यापीठाने गरजेनुसार योग्य, दर्जेदार आणि उद्दिष्टपूर्तीस पूरक प्रस्ताव सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी संशोधन, पायाभूत सुविधा विकास आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने हा सामंजस्य करार मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार या त्रिसुत्रीवर काम करणाऱ्या या विद्यापीठाच्या वतीने या सामंजस्य करारांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. यावेळी डॉ. सुभाष भालेकर यांनी सन २०२५-२६ या वर्षीच्या आय सी आय सी आय च्या माध्यमातून प्राप्त भरघोस निधीतून बळकटीकरणासाठी विकसित केलेल्या विविध कामांची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यात आल्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सुनिल लोहाटे यांनी केले तर आभार डॉ. सतिश जाधव यांनी मानले. यावेळी कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विभागीय कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.








