प्रशासनाला जाग येईना, आता देवाचाच सहारा ! नगर - शिर्डी महामार्गाचे 'ग्रहण ' सुटण्यासाठी राहुरीत राहू - केतूला अभिषेक
*प्रशासनाला जाग येईना, आता देवाचाच सहारा! नगर-शिर्डी महामार्गाचे 'ग्रहण' सुटण्यासाठी राहुरीत राहू-केतूला अभिषेक

शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला लागलेले ग्रहण सुटावे आणि या रस्त्याची 'साडेसाती' कायमची दूर व्हावी, या मागणीसाठी राहुरीतील व्यापारी असोसिएशन आणि संतप्त नागरिकांनी चक्क राहुरी येथील जगविख्यात राहू-केतू महाराजांच्या मंदिरात मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर अभिषेक घातला.

याप्रसंगी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे,रावसाहेब चाचा तनपुरे, राहुरी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे उपाध्यक्ष गजानन सातभाई, प्रतीक तनपुरे, रस्ता दुरुस्तीकृती समितीचे देवेंद्र लांबे,नवनीत दरक, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारक,नंदकुमार भट्टड, सूर्यकांत भुजाडी, अनिल कासार, विलास तरवडे,स्वप्निल कासार, विलास उदावंत, गणेश नेहे, संतोष आळंदे, बाळासाहेब उंडे, माधव बिडवे, प्रवीण ठोकळे, एकनाथ खेडेकर,लक्ष्मीकांत तनपुरे,संतोष लोढा, मोहन जोरी, प्रवीण दरक,अनिल भट्टड,मच्छिंद्र गुलदगड, सुनील देशपांडे उपस्थित होते.
प्रशासकीय अनास्था आणि ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता थेट ईश्वरी चरणी साकडे घातल्याने या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.
रस्त्याचे काम आणि समस्यांचा विळखा गेल्या अनेक महिन्यांपासून राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर-शिर्डी महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि रखडलेल्या कामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच, या महामार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर 'अध्यात्मिक' मार्गाने हा प्रश्न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.
अभिषेक केल्यानंतर नागरिकांनी प्रशासनासमोर खालील मागण्या आग्रहाने मांडल्या आहेत,राहुरी शहरातून जाणाऱ्या रस्त्याची रुंदी तातडीने ३० मीटर करण्यात यावी.महामार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. महामार्गावर सातत्याने होणारे जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात.
यावेळी बोलताना व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी प्रकाश पारख यांनी सांगितले की, "प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळतात, मात्र प्रत्यक्ष काम संथ गतीने सुरू आहे. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे. शहरी भागामध्ये रस्ता अरुंद केला जात आहे. रस्त्याचे काम करत असताना वाहतूक कोंडी होणार नाही याची कुठलीही काळजी घेतली जात नाही त्यामुळे महामार्गावरील वाहतूक शहरी भागामध्ये येते व शहरातील व्यापाऱ्यांच्या व्यवसाय उध्वस्त झालेले आहे हे 'ग्रहण' आता सुटावे, यासाठी आम्ही राहू-केतू महाराजांना अभिषेक घातला आहे."
या अनोख्या आंदोलनात राहुरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आता या 'अभिषेका'नंतर तरी महामार्गाच्या कामाला गती मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








