नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व उत्पादन चांगले मिळते - कुलगुरू डॉ. विलास खर्चे

नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व उत्पादन चांगले मिळते - कुलगुरू डॉ. विलास खर्चे

*नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व उत्पादन चांगले मिळते**-कुलगुरू डॉ. विलास खर्चे*

     महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशातले अग्रगण्य विद्यापीठ आहे. कृषी मधील कोणत्याही नवीन संशोधना संदर्भात आपल्या विद्यापीठाकडे आशेने बघितले जाते. नैसर्गिक शेतीवर विद्यापीठ शास्त्रीय दृष्ट्या काम करत आहे. नैसर्गिक शेती करताना नैसर्गिक शेतीच्या सर्व घटकांचा अवलंब केला तर चांगले उत्पादन मिळते. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते व उत्पादन चांगले मिळते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. 

    महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालया अंतर्गत विज्ञान केंद्रांचे प्रमुख व विषय विशेषज्ञांसाठी एक दिवसीय नैसर्गिक शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाने, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, आनंद कृषी विद्यापीठाचे कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. व्ही. जे. पटेल, प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र डॉ. एच. सी. पटेल, कृषी तंत्रज्ञान शिक्षणाचे संयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके उपस्थित होते.

     कुलगुरू डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले कृषी विज्ञान केंद्रांनी प्रत्येक हंगामात त्यांच्या जिल्ह्याच्या पीक परिस्थितीवर आधारित पीक संग्रहालय करावेत. कृषी विद्यापीठाने विकसित हंगामनिहाय तंत्रज्ञान त्या प्रक्षेत्रांवर प्रात्यक्षिकांद्वारे प्रदर्शित करावे. तंत्रज्ञान प्रसाराचे काम मिशन मोडमध्ये करा. फुले कृषी तंत्रज्ञान घरोघरी समृद्धी येईल गावोगावी या उपक्रमाद्वारे आपण विद्यापीठच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यातील दहा गावे दत्तक घेऊन एकात्मिक पद्धतीने कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून समृद्ध गाव घडवणार आहोत.

     यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाने प्रास्ताविक करताना म्हणाले नैसर्गिक शेती ही आता काळाची गरज झाली आहे. या नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी कुलगुरूंच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी आनंद कृषी विद्यापीठाचे डॉ. व्ही. जे. पटेल आणि डॉ. एच. सी. पटेल यांनी गुजरातमध्ये नैसर्गिक शेतीवर केलेले प्रयोगासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी त्यांनी नैसर्गिक शेतीमध्ये बिजामृत, जीवामृत, अच्छादन, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र, निमास्त्र, दशपर्णीय अर्क याचा उपयोग कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. प्रशांत बोडके, डॉ. व्ही. एस. पाटील, डॉ. उत्तम कदम, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. आर. टी. गायकवाड यांनी नैसर्गिक शेतीची सद्यस्थिती व भविष्यातील संधी, नैसर्गिक शेती अनुषंगिक संशोधन आणि त्याचा वापर, नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक जमीन आरोग्य व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीतील पिकांचे कीड व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीतील पिकांचे रोग व्यवस्थापन या विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींनी सेंद्रिय शेती प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येत असलेले नैसर्गिक शेतीच्या प्रयोगांना भेट दिली.

         याप्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे,  कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख आणि आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले.