उबेर गाडी बुक करून प्रवासात कोयत्याच्या धाकाने कार पळविणारी टोळी जेरबंद ;ठाणे येथून11,71,200 /- रु. च्या मुद्देमालासह 3 आरोपी ताब्यात.
*उबेर गाडी बुक करून प्रवासात कोयत्याच्या धाकाने कार पळविणारी टोळी जेरबंद*
*बदलापूर जि.ठाणे येथून 3 आरोपी ताब्यात - 11,71,200/- रू किं.मुद्देमाल जप्त*
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 01/10/2026 रोजी रात्री 02.30 वा.सुमारास फिर्यादी सोपान गोविंद दंडगुले,वय 36, धंदा ड्रायव्हर, रा.साई पार्क लेन नं.1, दिघी, पुणे हे उबेर कंपनीकडून मिळालेले भाडे घेऊन नाशिक येथून शिर्डीकडे जात होते.त्यावेळी गाडीमधील बसलेल्या तीन इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीचे तोंड, डोळे, हात, पाय बांधुन वांबोरी राहुरी येथे आणून, फिर्यादीस गाडीमधुन ढकलून फिर्यादीची इरटिगा कार व मोबाईल जबरीने घेऊन गेले.याबाबत राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1133/2026 बीएनएस कलम 309 (6), 140(3), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणाचा तात्काळ छडा लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले.त्यानुषंगाने संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोउपनि/संदिप दरवडे व पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, विशाल तनपुरे, भगवान सानप, सतीष भवर, फुरकान शेख, प्रशांत राठोड व भगवान धुळे याचे पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
दिनांक 03/10/2026 रोजी पथक गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा समांतर तपास करत असताना नमूद गुन्हा हा 1) शामसुंदर रविप्रताप गौड, रा.नेताजी सुभाष चौक, बदलापूर, जि.ठाणे 2) सिध्दार्थ मिथवा चव्हाण, रा.बदलापूर इस्ट व 3) किसन दिग्वीजय कहार, रा.विजयपूर, उत्तरप्रदेश अशांनी केला असून ते सध्या बदलापूर, जि.ठाणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने बदलापूर, जि.ठाणे येथे जाऊन आरोपीतांचा शोध घेऊन ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीतांना गुन्हयांचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी नाशिक येथून उबेर कंपनीमार्फत नाशिक येथून इरटिगा गाडीमधुन शिर्डीकडे येत असताना त्यांनी कोपरगाव परिसरातुन ड्रायव्हरला गाडी पोहेगावला घेण्यास सांगीतली.त्यानंतर आरोपीतांनी फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून, मोबाईल घेऊन त्याचे हात पाय दोरीने बांधुन चालकास वांबोरी, ता.राहुरी येथे सोडून दिले असल्याची माहिती सांगीतली.तसेच इरटिगा गाडीबाबत विचारपूस केली असता त्यांनी इरटिगा ही जेऊर टोलनाक्याजवळ, हनुमान मंदिर परिसरामध्ये लावून, गाडी लॉक करून निघुन गेले व गाडीच्या विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती सांगीतली.

ताब्यातील आरोपीतांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन 1,71,000/- रूपये किं.त्यात तीन मोबाईल, एक सीमकार्ड व एक मारूती सुझुकी कंपनीची चावी असा मुद्देमाल जप्त केला.तसेच आरोपीने पंचासमक्ष गुन्हयातील कार जेऊर टोलनाक्याजवळ लावलेले ठिकाण दाखविल्याने तेथून 10,00,000/- रू किं.मारूती सुझुकी इरटिगा कार, 200/- रू कि.त्यात दोन लोखंडी कत्ती असा एकुण 11,71,200/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील कारवाई ही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.








