दुष्काळ जाहीर करूनही पुणे विद्यापीठाकडून परीक्षा शुल्क वसुली ;विद्यार्थ्यांची छळवणूक थांबवा - छात्रभारती
*दुष्काळ जाहीर करूनही पुणे विद्यापीठाकडून परीक्षा शुल्क वसुली; विद्यार्थ्यांची छळवणूक थांबवा — छात्रभारती*
संगमनेर :
महाराष्ट्र राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी परिपत्रक काढलेले असतानाही पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारले जात आहे. शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काहीही पिकलेले नाही. अनेक शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करणे ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक बाब आहे.
संगमनेरमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म दाखवत या प्रकाराचा निषेध केला. शासनाने परीक्षा शुल्क माफ करण्याचे केवळ परिपत्रक काढून उपयोग काय, जर त्याची अंमलबजावणीच होणार नसेल? असा सवाल छात्रभारतीच्या वतीने करण्यात आला.
मुख्यमंत्री महोदय आणि शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष द्यावे. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आधीच वसूल करण्यात आले आहे, त्यांचे शुल्क त्यांच्या खात्यावर तात्काळ परत जमा करावे.
याशिवाय, परीक्षा शुल्क न भरलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, याबाबत राज्यातील सर्व विद्यापीठांना तात्काळ स्पष्ट आदेश देण्यात यावेत, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना कागदावरची मदत नको, तर प्रत्यक्ष दिलासा हवा. शासनाने विद्यार्थ्यांची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल न करता आपल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी.या वेळी छात्र भारती संगमनेर च्या वतीने या गोष्टीचा सह्याद्री कॉलेज येथे निषेध करण्यात आला.








