*शेतीमधील डिजीटल तंत्रज्ञान हे कृषिचे भविष्य* *- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*

*शेतीमधील डिजीटल तंत्रज्ञान हे कृषिचे भविष्य* *- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*

*राहुरी विद्यापीठ, दि. 26 मार्च, 2023*

 नाहेप-कास्ट प्रकल्पांतर्गत ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता, रोबोटीक्स तंत्रज्ञान, आय.ओ.टी., नेटवर्किंग या विषयांवर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी व सामंजस्य करारासाठी 4 अधिकारी, 14 प्राध्यापक व 20 विद्यार्थी परदेशात व इतर राज्यांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले होते. पारंपारीक शेतीचे डिजीटल शेतीमध्ये रुपांतरीत करण्याचे काम या कृषि विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पांतर्गत होत आहे. शेतीमध्ये उपलब्ध साधन सामुग्रीचा कार्यक्षमतेने वापर करुन उत्पादन वाढविणे हा उद्देश आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरुन शेतीच्या निविष्ठांवर होणार्या खर्चात बचत करणे शक्य आहे. यासाठी संरक्षीत शेती, रोबोटीक्स, आय.ओ.टी., ड्रोन तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. डिजीटल शेती हे कृषिचे भविष्य आहे असे प्रतिपादन अध्यक्षिय मार्गदर्शन करतांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. 

 नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र (नाहेप-कास्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षीत शेतीसाठी गुगल अर्थ इंजिन, आय.ओ.टी. व ड्रोन आणि हवामान अद्ययावत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे कृषि विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील ऑनलाईन उपस्थित राहुन बोलत होते. यावेळी भा.कृ.अ.प.चे उपमहासंचालक (शिक्षण) आणि रा.कृ.उ.शि.प्र.चे राष्ट्रीय निदेशक डॉ. आर.सी. अग्रवाल ऑनलाईन उपस्थित होते. नागपूर येथील भा.कृ.अ.प.-राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरोचे संचालक डॉ. एन.जी. पाटील उपस्थित होते. बैंकॉक येथील जीओ इंफोरमॅटीक्स सेंटर, आशियन इंस्टीट्युट टेकनॉलीचे संचालक डॉ. मंझुल कुमार हजारीका, कास्ट प्रकल्पाच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनुराधा अग्रवाल ऑनलाईन उपस्थित होत्या. याप्रसंगी संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार व हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे उपस्थित होते. 

 यावेळी ऑनलाईनद्वारे प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ. आर.सी. अग्रवाल म्हणाले आय.ओ.टी., ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटीक्स तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता या तंत्रज्ञानामध्ये शेतीचे भविष्य आहे. ड्रोन तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुध्दिमत्तेचा उपयोग करुन शेतीमध्ये उत्पादनाचे व उत्पन्नाचे नवे मापदंड प्रस्थापीत होऊ शकतात. हे डिजिटल तंत्रज्ञान शेतीमध्ये नवे आयाम प्रस्तापीत करु शकतात. हे तंत्रज्ञान पुढे जावून फार स्वस्त होणार आहे. नाहेप-कास्ट प्रकल्पाद्वारे या तंत्रज्ञानांची दिशा निश्चित होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉ. एन.जी. पाटील म्हणाले कृत्रिम बुध्दिमत्ता, आय.ओ.टी. तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, जी.आय.एस., अल्गॉरिदम या तंत्रज्ञानांमध्ये प्रचंड क्षमता आहे. शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे. जी कामे अशक्य आहे किंवा वेळखाऊ आहे अशी सर्व कामे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एका क्लिकवर होऊ शकतात. या तंत्रज्ञानामध्ये इतकी ताकद आहे की आपली भविष्यातील शेती आपण घरात बसून संगणकाच्या सहाय्याने करु शकु. याप्रसंगी डॉ. मंझुल कुमार हजारीका, डॉ. अनुराधा अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. 

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, मान्यवरांचे स्वागत अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण यांनी केले तर आभार कास्ट प्रकल्पाचे सह समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिल कदम यांनी केले. या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये अमेरीका, जपान व बैंकॉकवरुन प्रशिक्षण घेवून आलेले अधिकारी, प्राध्यापक यांचे संरक्षीत शेतीसाठी गुगल अर्थ इंजिन, आय.ओ.टी., ड्रोन, कृत्रिम बुध्दीमत्ता, डिजीटल तंत्रज्ञान इं. विषयांवर व्याख्याने होणार आहेत. योवळी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि महाविद्यालय, पुणे, धुळे, कोल्हापूर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुर, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेस ऑनलाईन पध्दतीने राज्यातून विद्यार्थी उपस्थित होते.