कोल्हार येथे डाळिंबावरील रोग व किडींच्या व्यवस्थापनाबाबत कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कोल्हार येथे डाळिंबावरील रोग व किडींच्या व्यवस्थापनाबाबत कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

*कोल्हार येथे डाळिंबावरील रोग व किडींच्या व्यवस्थापनाबाबत कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन*

 

          महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील शास्त्रज्ञांनी मौजे कोल्हार, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथील डाळिंब फळपिकाच्या बागांना भेट देऊन पाहणी केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. उत्तम कदम, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाचे रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय हजारे उपस्थित होते. 

          या क्षेत्रभेटीदरम्यान डॉ. उत्तम कदम यांनी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना डाळिंब लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड करण्याचे आवाहन केले. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, योग्य निचरा असलेल्या जमिनीत डाळिंबाची लागवड केल्यास बागेतील पाणी साचण्याची समस्या कमी होण्यास आणि झाडांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. त्यामुळे बागेचे दीर्घकालीन व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येते असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. प्रकाश मोरे यांनी डाळिंब पिकातील मर रोगाची लक्षणे ओळखणे, रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरणारे घटक लक्षात घेणे आणि रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी एकात्मिक उपाययोजना अवलंबणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. अजय हजारे यांनी डाळिंबाच्या खोडकिडीचा प्रादुर्भाव ओळखणे, नियमितपणे बागेची पाहणी करणे आणि योग्य वेळी प्रतिबंधात्मक व व्यवस्थापनात्मक उपाययोजना राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

 

           सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत डाळिंब बागांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे काटेकोर नियोजन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२, फुले सुपर बायोमिक्स, ट्रायकोडर्मा प्लस, फुले बगीसाईड तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरडवाहू फळपिकांच्या तंत्रज्ञानाचा शिफारशीनुसार वापर करण्याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, बागेची नियमित पाहणी आणि रोग-किडींचे वेळीच व्यवस्थापन केल्यास प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही डाळिंब बागांचे नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते असे शास्त्रज्ञांनी यावेळी सांगितले.

 

       या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यापीठाचे संशोधन आणि शिफारशीत तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून डाळिंब उत्पादनातील अडचणींवर शास्त्रीय उपाययोजना सुचविणे हा होता. यावेळी श्री. वसंत हरिभाऊ खर्डे, श्री. बाबासाहेब गोविंद खर्डे, श्री. अतुल राजेंद्र कापसे, श्री. बाबासाहेब रामदास गाढे, श्री. आप्पासाहेब आनंदा खर्डे, श्री. आबासाहेब नेहे, श्री दीपक आण्णासाहेब भिंगारदे यांच्यासह परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.