नगर - शिर्डी महामार्ग की मृत्युचा सांगाडा ? अवजड वाहतूक तात्काळ वळवा , अन्यथा गाठ आमच्याशी !
*नगर-शिर्डी महामार्ग की ‘मृत्यूचा सांगडा’? अवजड वाहतूक तात्काळ वळवा, अन्यथा गाठ आमच्याशी!*
* दिवाळीत दुचाकीस्वारांचे बळी घेणारा रस्ता बंद करा; शिवसेना व रस्ता दुरुस्ती कृती समिती आक्रमक
* देवेंद्र लांबे पाटील यांचा जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला थेट इशारा
राहुरी (प्रतिनिधी):
कोल्हार ते अहिल्यानगर महामार्गावर सध्या खड्ड्यांचे आणि अर्धवट कामाचे साम्राज्य पसरले असून, दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये याच रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू होऊन निष्पाप दुचाकीस्वारांचे नाहक बळी जातात. तरीही प्रशासन डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प बसले आहे का? असा संतप्त सवाल नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र एस. लांबे पाटील यांनी उठवला आहे. आगामी दिवाळीच्या काळात दुचाकीस्वारांचे प्राण वाचवण्यासाठी नगर-शिर्डी महामार्गावरील अवजड वाहतूक जानेवारी २०२७ पर्यंत तात्काळ इतर मार्गाने डायव्हर्ट करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा थेट इशारा लांबे पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.
दरवर्षी दिवाळीत निष्पाप दुचाकीस्वारांचा बळी का?आगामी काळात दिवाळी व पाडव्याच्या सुट्ट्यांमुळे शिर्डी-शनी शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढणार आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड अवजड वाहन रस्त्यावर सुरू झाली आहे. कोल्हार ते नगर टप्प्यात दररोज तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, प्रवाशी अडकून पडत आहेत. "सणासुदीच्या दिवसांत दुचाकीस्वारांचे अपघात होऊन अनेक घरे उद्ध्वस्त होतात. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा महामार्ग प्रवाशांसाठी ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे का?" असा थेट हल्लाबोल लांबे पाटील यांनी केला.
"रस्त्याचे काम सुरू असताना अवजड वाहनांना या मार्गावर मुभा देणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. प्रशासनाने तात्काळ पोलीस यंत्रणेला पाचारण करून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. जर सणांच्या काळात एकाही दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याला थेट जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि त्यानंतर होणाऱ्या तीव्र जनक्षोभाची पूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच असेल," असा आक्रमक पवित्रा देवेंद्र लांबे पाटील यांनी घेतला आहे.








