प्रभू श्रीराम व अध्यात्म.

प्रभू श्रीराम व अध्यात्म.

*प्रभू श्रीराम व अध्यात्म*

 

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ 

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ (श्रीमद् भगवद् गीता)

 

जेंव्हा-जेंव्हा या धरतीवर अधर्म वाढतो , तेंव्हा-तेंव्हा धर्म स्थापने हेतू साधू सज्जन पुरुषांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी ; ती दिव्यशक्ती मानव देह धारण करून या धरेवर अवतरीत होते आणि संपूर्ण जीवात्म्यांच्या उद्धारासाठी आपले महान कार्य करून ती ईश्वरी शक्ती देह रूपाने आपल्यातून जाते ; परंतु सुक्ष्म रूपाने सृष्टीच्या कणाकणात, सर्व जीव प्राणीमात्रांमध्ये ती दिव्यशक्ती रमण करते ; त्या दिव्यशक्तीचा ना कधी जन्म होतो ; ना कधी अंत…..

परंतु संत महापुरुषांची वाणी आपण कधी समजावून घेतली का ? ज्ञानियांचे राजे संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आपल्या वाणीमध्ये म्हणतात-

 

सर्वाघटी राम देहा देही एक | सूर्यप्रकाशाक सहस्त्र रश्मीं ||

 

सर्व जीव प्राणीमात्रांच्या देहामध्ये भगवान श्रीराम आत्मतत्वाच्या रूपाने विराजमान आहे ; हजारो सूर्यांचा प्रकाश एकाच वेळी उदित व्हावा ; यापेक्षाही प्रखर ती दिव्यशक्ती प्रकाशमान आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या वाणीमध्ये स्पष्ट म्हणतात -

अनंत ब्रह्मांड जयाचे उदरी | तो माझ्या अंतरी आत्माराम ||

          संत तुकाराम महाराज आपल्याला समजवताना म्हणतात, ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड सामावलेले आहे,तीच रामरुपी परमशक्ती माझ्या अंतरी आत्मतत्त्वाने विराजमान आहे.

शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज आपल्याला प्रभू श्रीरामाच्या दिव्यशक्ती बद्दल समजाविताना म्हणतात -

उठतां बैसतां खेळता बोलतां । चालतांनिजतां राम म्हणा ॥१॥

आसनीं शयनी भोजनीं परिपुर्ण । वाचे राम नारायण जप करीं ॥२॥

कार्याकारणीं समाधीं उन्मनीं । राम ध्यानींमनीं जपे सदा ॥३॥

एकांती लोकांती देहत्यागांअंती । रामनाम वस्ती जिव्हेवरी ॥४॥

एका जनार्दनीं वाचे वदे राम । अखंड निष्काम होसी बापा ॥५॥

         आपले जीवन जगत असताना उठता,बसता,खेळता,चालता, झोपता,जेवता राम म्हणा, आपण एकांत असताना तसेच लोकांत (गर्दीत) असताना तसेच मृत्यू समयी राम नामाचा जप करण्याचा उपदेश आपल्याला करीत आहेत. 

खरंच आपण सर्व कामे करिता राम नामाचा जप करू शकतो का ? काय आपणाला जेवण करतानाही राम नामाचा जप करण्याची विधी अवगत आहे काय?

 

संत कबीर आपल्या वाणीमध्ये म्हणतात -

 

सबमें रमै रमावै जोई, ताकर नाम राम अस होई ।

  

घाट - घाट राम बसत हैं भाई, बिना ज्ञान नहीं देत दिखाई। 

आतम ज्ञान जाहि घट होई, आतम राम को चीन्है सोई। 

 

कस्तूरी कुण्डल बसै , मृग ढूंढ़े वन माहि। 

ऐसे घट - घट राम हैं, दुनिया खोजत नाहिं । 

 

संपूर्ण जीव प्राणीमात्रा तसेच सृष्टीच्या कणाकणामध्ये रामरुपी शक्ती विराजमान आहे; परंतु ब्रह्मज्ञानाशिवाय ती दिव्यशक्ती दिसत नाही, प्रत्येकाच्या देहात आत्माराम स्थित आहे, ज्याप्रमाणे कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असते ; परंतु कस्तुरी मृग त्या सुगंधाला वनामध्ये इतरत्र शोधत फिरतो, ठीक त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या देहात आत्माराम असतानाही हे जग, त्या दिव्य अतिदिव्य आत्मारामाला शोधत का नाही ?

 

पुढे संत कबीर आपल्या वाणीमध्ये म्हणतात -

 

चार राम हैं जगत में,तीन राम व्यवहार ।  

चौथ राम सो सार है, ताका करो विचार ॥

  

एक राम दसरथ घर डोलै, एक राम घट-घट में बोलै । 

एक राम का सकल पसारा, एक राम हैं सबसे न्यारा ॥ 

 

सकार राम दसरथ घर डोलें, निराकार घट-घट में बोलै । 

बिंदराम का सकल पसारा, अकः राम हैं सबसे न्यारा ॥ 

 

नंनम निरंजन रारा, निरालम्ब राम सो न्यारा । 

सगुन राम विष्णु जग आया, दसरथ के पुत्र कहाया ॥ 

 

पिंड ब्रह्माण्ड में आतम राम, तासु परें परमातम नाम ॥ 

 

वरील वाक्याचा भावार्थ असा की,रामरुपी दिव्यशक्ती सृष्टीच्या कणकणामध्ये रमण करते, असत्याचा नाश करण्याकरिता ती पुन्हा या धरेवर साकार स्वरूपात अवतरीत होते, कधी भगवान श्रीकृष्ण बनवून तर कधी प्रभू श्रीरामाच्या रूपाने सगुण स्वरूपात अवतरीत होते, परंतु अनंत काळासाठी निर्गुण निराकार ती दिव्यशक्ती सर्व प्राणीमात्रांच्या अंतर्घटामध्ये आत्मतत्वाच्या रुपाने वास करते.

 

भगवान श्रीकृष्णाची भक्त संत मीराबाई म्हणतात -

 

वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु ।

कृपा कर अपनायो ॥

पायो जी मैंने राम रतन धन पायो ।

पायो जी मैंने राम रतन धन पायो ।

 

खर्च ना खूटे, चोर ना लूटे।

दिन दिन बढ़त सवायो॥

पायो जी मैंने राम रतन धन पायो ।

पायो जी मैंने राम रतन धन पायो ।

 

सत की नाव खेवटिया सतगुरु।

भवसागर तरवयो॥

पायो जी मैंने राम रतन धन पायो ।

पायो जी मैंने राम रतन धन पायो ।

 

संत मीराबाई म्हणतात - माझ्या सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली आणि मला अमूल्य रामरूपी धन दिले. जे धन घेण्यासाठी खर्च लागत नाही आणि त्या धनाला चोरही लुटत नाही, दिवसेंदिवस ते धन वाढतच जाते. ज्या रामनामाने सद्गुरु मला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवितो.

संत मीराबाई कोणत्या रामरुपी धनाची चर्चा या ठिकाणी करीत आहेत;हे आपण कधी समजावून घेणार आहोत ?

        

श्रीरामचरित मानस मध्ये स्पष्ट केले आहे की-

 

राम अतर्क्य, बुद्धि मन बानी | मत हमार अस सुनहि सयानी ||

 

भगवान शिव माता पार्वतीला समजावून सांगतात की, हे सयानी! राम शरीर नसून स्वयं परब्रह्म आहेत, त्यांना तर्काद्वारे अथवा मन, बुद्धी किंवा वाणीद्वारे जाणले जाऊ शकत नाही.

 

संत नामदेव महाराज देखील आपल्या एका रचनेच्या माध्यमातून स्पष्ट करतात की-

 

मंत्र तंत्र दिक्षा, सांगतील लक्ष, परी राम प्रत्यक्ष न करी कोन्ही |

  प्रत्यक्ष दावील राम धरीन त्याचे पाय आणिकाचे काय चाड मज |

 सर्वकामी राम भेटविल माते, जीवेभावे त्यातें ओवाळीन |

 नामा म्हणे आम्हां थोर लाभ झाला, सोयरा भेटला अंतरीचा||

     

         आज जगामध्ये मंत्र तंत्र दिक्षा सांगणारे लाखो लोक आहेत. परंतु प्रभू श्रीरामाला आमच्या समक्ष प्रत्यक्ष करण्याचे सामर्थ्य कोणातही आढळत नाही. संत नामदेव महाराज म्हणतात की, जो मला प्रत्यक्ष प्रभू श्रीरामाचे दर्शन करून देईल, त्याचे पाय मी धरीन, त्याला जीवे भावे ओवाळीन.मला माझ्या जीवनामध्ये श्रीरामाच्या अनंत स्वरूपाचे दिव्य दर्शन अंतर्घटामध्ये घडून देणारा अंतरीचा सोयरा सद्गुरु विसोबा खेचारांच्या रूपामध्ये भेटला आहे.

 

संत तुकाराम महाराज म्हणतात-

 

राम राम राम अवघेचि म्हणती,कोणी न जाणती आत्माराम|

राम हा कालचा सूत दशरथाचा, अनंत युगांचा आत्माराम|

त्या रामासी हा राम ठावे जरी असता, शरण का जाता वसिष्ठासी|

 तुका म्हणे राम तुझा तुजपाशी, पुसुनी घेशी गुरुमुखे|

 

       संत तुकाराम महाराज म्हणतात , राम राम तर सर्वच म्हणतात; परंतु आपल्या देहामध्ये स्थित आत्मरामाला जाणत नाहीत. प्रभू श्रीराम हे दशरथ राजाचे पुत्र त्रेतायुगी सगुण रूपात अवतारित झाले, परंतु अनंत युगासाठी सर्व सृष्टीच्या कणाकणामध्ये , सर्व जीव प्राणीमात्रांच्या अंतर्घटामध्ये आत्माराम स्थित आहे. प्रभू श्रीरामाला जरी अनंत काळाचा आत्माराम माहिती असला , तरीही ते गुरु वसिष्ठ मुनींना का शरण जातात? पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, तुझा आत्माराम तुझ्याच जवळ आहे, सद्गुरूंच्या मुखातून त्या दिव्यशक्तीरुपी आत्मारामाला ओळखून घे.

संत तुकाराम महाराज म्हणतात-

साखरेचे मूळ उसे तैसा देही देव दिसे||

तुका सांगे मूढ जना देही देव का पहाना||

ज्याप्रमाणे साखर ही उसामध्ये लपलेली आहे; त्याचप्रमाणे देव देखील याच शरीररुपी घटामध्ये लपलेला आहे. पूर्ण सद्गुरूंशी शरण प्राप्त करून आपण देहामधील देव का पाहत नाहीत ?

 

            संत महापुरुषांच्या दिव्य वाणीला जर आपण अभ्यासले तर असे लक्षात येते की ,प्रभू श्रीरामाला सुद्धा सद्गुरु वसिष्ठ मुनींना शरण जाऊन दिव्य ब्रह्मज्ञान प्राप्त करून देहामध्ये स्थित असलेल्या आत्मारामाला ओळखावे लागले.

हे अटळ सत्य आहे की, जेंव्हा कोणी ईश्वराचा शोध घेतला, एका पूर्ण सद्गुरूंनी त्यांचे मार्गदर्शन केले. संत मीराबाईला संत रविदास , संत जनाबाईला संत नामदेव, संत नामदेवांना संत विसोबा खेचर , स्वामी विवेकानंदांना श्री रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्वरांना श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्यासारखे गुरू लाभले. अशा ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या सानिध्यामध्ये शिष्याला ईश्वराच्या वास्तविक स्वरूपाचे त्यामध्ये स्थित असलेल्या आत्मारामाचे आपल्या देहामध्येच दिव्य प्रकाश स्वरूपात दर्शन होते . 

म्हणून संत कबीरजींनी स्पष्ट सांगितले की,

 

 सुना सुनी की बात नहीं ,देखा देखी की बात |

 

 गुरु केवळ वाचन श्रवण किंवा पठण करत नाही; तर तो ईश्वराचा साक्षात्कार करून देतो अर्थात देहामध्ये स्थित असलेल्या आत्मारामाचे प्रत्यक्ष दिव्य प्रकाश स्वरूपात दर्शन करून देतो. म्हणून

संत एकनाथ महाराज म्हणतात-

 

एका जनार्दनी माझे कसे केले हित| देही दाखविला देव मज ||

 

सद्गुरु जनार्धन स्वामींनी माझे कसे हित केले . माझ्या देहामधील स्थित आत्मरूपी ईश्वर मला दाखविला.ईश्वर भक्तहो प्रभू श्रीराम फक्त मानण्याचा विषय नाही;तर प्रभू श्रीराम जाणण्याचा विषय आहे.

 

ईश्वरीय अवतार आणि इतर संत महापुरुष यांनी पूर्ण सद्गुरूंची शरण प्राप्त करून त्या अनंत काळाच्या आत्मारामाला जाणले आहे; परंतु आजचा मनुष्य या महापुरुषांनी दिलेल्या गुरूपरंपरेच्या मार्गाला विसरत चाललेला आहे, गरज आहे पुन्हा एकदा संत महापुरुषांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालण्याची, ब्रह्मनिष्ठ पूर्ण सद्गुरूंच्या चरणी शरण जाऊन ते दिव्य अतिदिव्य ब्रह्मज्ञान घेऊन आपल्या देहामध्ये स्थित असलेल्या आत्मारामाला ओळखून आपले जीवन धन्य करण्याची ; यातच आपल्या मानवी जीवनाची सार्थकता आहे.

              ...जय श्रीराम जय जय श्रीराम...

 

संकलन/विषय मांडणी: श्री गणेश एडके सर

जय श्रीराम विद्यामंदिर मुकिंदपूर

मो.न. 9561027563