*महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी फुले कृषी वाहिनीचे कार्य कौतुकास्पद कुलगुरु डॉ.प्रभात कुमार यऊल*

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध पिकांमध्ये नवनवीन वाणांची निर्मिती तसेच प्रयोगशाळेमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. विद्यापीठाच्या या तंत्रज्ञानाचा प्रसार विद्यापीठाने 2023 मध्ये सुरू केलेल्या फुले कृषी वाहिनी 90.8 एफएम या वाहिनीमार्फत परिसरातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत होत आहे. शेतकरी व शेतीशी संबंधित काम करणाऱ्या विविध घटकांपर्यंत विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोहोचण्यासाठी या फुले कृषी वाहिनीचा वापर निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन भुवनेश्वर येथील ओरिसा कृषी आणि वैशियीकी विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. प्रभात कुमार राऊल यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील विविध प्रकल्पांना भेटी दिल्यानंतर फुले कृषी वाहिनी 90.8 एफएमला भेट दिल्यानंतर कुलगुरू डॉ. प्रभात कुमार राऊल बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी तसेच वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल, उद्यानविद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र क्षीरसागर, फुले कृषी वाहिनीचे प्रमुख डॉ. आनंद चवई व संशोधन संचालनालयाचे डॉ. संजय तोडमल उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. प्रभात कुमार राऊल यांनी आज सकाळी दहा वाजल्यापासून विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्या.

या भेटीदरम्यान औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाबद्दल डॉ. विक्रम जांभळे यांनी, फळपिके प्रात्यक्षिके व भाजीपाला प्रकल्प, उद्यानविद्या रोपवाटिका, काढणी पश्चात तंत्रज्ञान याबद्दल डॉ. राजेंद्र क्षीरसागर, डॉ. अमोल क्षीरसागर व डॉ. शर्मिला शिंदे यांनी, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र व फुले कृषी वाहिनी 90.8 एफएम याबद्दल डॉ. आनंद चवई यांनी, काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाबद्दल डॉ. सुनील कदम व डॉ. पवन कुलवाल यांनी तर फुले सुपर बायोमिक्स निर्मिती प्रकल्पाबद्दल डॉ. आर. टी. गायकवाड यांनी, अवजारे प्रकल्पाबद्दल डॉ. रविकिरण राठोड यांनी, बेकरी युनिटबद्दल डॉ. बाबासाहेब भिटे यांनी, कीडनाशक अवशेष पृथक्करण प्रयोगशाळेबद्दल डॉ. योगेश सैंदाणे व डॉ. भाईदास देवरे यांनी माहिती दिली.








