लोणी - प्रवरानगर येथील नागरिक चार पायाच्या भाई मुळे दहशतीत.. प्रशासन मात्र गार झोपेत..?
लोणी - प्रवरानगर येथील नागरिक चार पायाच्या भाई मुळे दहशतीत.. प्रशासन मात्र गार झोपेत..?
राहता प्रतिनिधी │प्रसाद घोगरे: ९३७०३२८९४५.
लोणी – प्रवरानगर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांबेनगर, घोगरे वस्ती, नेहरूनगर, लोहगाव, थेटे वस्ती, आहेर वस्ती या भागात बिबट्याची हालचाल सातत्याने होत असून, अनेक नागरिकांचे पाळीव कुत्रे व जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात फस्त झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळाली आहे.
नागरिक जीव मुठीत घेऊन दिवस काढत असून, रात्रीच्या वेळी कोणीही घराबाहेर पडण्यास घाबरत आहे. “बिबट्या आता नागरिकांच्या आंगणात फुगडी खेळेल इतका बेफाम झाला आहे,” अशी प्रतिक्रिया काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मात्र एवढ्या गंभीर परिस्थितीतही वन विभाग व स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. “एखादी मोठी दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होईल का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
वन विभाग व प्रशासनाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना कराव्या अशी मागणी आता जोर धरताना दिसत आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांत बिबट्यांचा बंदोबस्त न झाल्यास नागरिक प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी प्रशासनावरच येणार असल्याचं नागरिक स्पष्टपणे सांगत आहेत.
लोणी – प्रवरानगर परिसरातील नागरिकांकडून सातत्याने प्रशासनाला कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले की, बिबट्याला पकडण्याचे कोणतेही प्रोव्हिजन नसून, तुम्ही स्वतः पिंजरा घेऊन जा, व बिबट्या जेरबंद करा असा अजब सल्ला दिल्याची माहिती एका शेतकऱ्याने आमच्याशी बोलतांना दिली..








