किरकोळ वादातून वळण येथे एका तरुणावर चाकूने वार करून खून

किरकोळ वादातून वळण येथे एका तरुणावर चाकूने वार करून खून

किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूचे वार करून खुन 

राहुरी तालुक्यातील वळण येथे दि. ४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूचे वार करण्यात आले. या घटनेत तरुण ठार झाला असून वळण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलीस पथकाने संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. 

            कृष्णा ऊर्फ दादा शंकर कुलट, वय २६ वर्षे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा ऊर्फ दादा कुलट व संशयित आरोपी उद्धव खुळे यांच्यात दि. ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान वळण येथील दत्त मंदिर जवळ किरकोळ वाद झाले. तेव्हा उद्धव खुळे याने कृष्णा ऊर्फ दादा कुलट याच्यावर धारदार चाकूने वार केले. यावेळी काही जणांनी कृष्णा ऊर्फ दादा कुलट याला तातडीने राहुरी येथील एका रुग्णालयात आणले. त्यानंतर त्याला अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा ऊर्फ दादा कुलट याला तपासून उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. यावेळी कृष्णा ऊर्फ दादा कुलट याचे मित्र व नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात तसेच राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. तर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

             दरम्यान पोलिस पथकाने या घटनेतील संशयित आरोपी उद्धव नंदलाल खुळे याला काही वेळातच ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. या घटने नंतर वळण परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे