प्रवरानगर येथे वाळू वाहतूक करणारा डंपर पलटी; मोठी दुर्घटना टळली — अवैध वाहतुकीवर प्रशासनाची भूमिका चर्चेत
प्रवरानगर येथे वाळू वाहतूक करणारा डंपर पलटी; मोठी दुर्घटना टळली — अवैध वाहतुकीवर प्रशासनाची भूमिका चर्चेत
प्रतिनिधी : प्रसाद घोगरे (९३७०३२८९४४)
प्रवरानगर कारखाण्यासमोर भरधाव वेगात जाणारा वाळू वाहतूक करणारा डंपर पलटी होऊन मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
राहता तालुक्यात सध्या वाळू व मुरूमची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातील काही वाहतूक अवैध असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत असून, याकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर डंपर प्रवरानगर परिसरात आल्यानंतर तहसील कार्यालयाशी संबंधित सदाफळ नावाच्या व्यक्तीने डंपर अडविल्याची चर्चा आहे. मात्र त्यानंतर योग्य कायदेशीर कारवाई न करता, मोठी तोडपाणी करून सदर डंपर सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे..
आरटीओ, महसूल व पोलीस प्रशासन यांच्या कार्यक्षेत्रात ही वाहतूक सुरू असताना, प्रशासन मात्र काय करते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे, या प्रकरणात कायदेशिर कारवाई न करता, नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
या संपूर्ण घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा काही जागरूक नागरिकांनी दिली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.








