कृषी अभियांत्रिकी विषयातील विविध संधीचा फायदा घेऊन आपले करिअर घडवावे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील.
कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यांनी यासाठी अधिक जागृत राहून अभियांत्रिकीच्या विषयांबरोबरच विविध संधीचा फायदा घेऊन विविध क्षेत्रांमध्ये करिअर घडवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. या प्रसंगी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर महानगरपालिकाचे आयुक्त श्री. यशवंत डांगे उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव श्री. अरुण आनंदकर, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. मुकुंद शिंदे, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, डॉ. वीरेंद्र बारई व सहाय्यक कुलसचिव श्री. वैभव बारटक्के उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील बी. टेक. पदवीनंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचे करिअर करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री. यशवंत डांगे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी कशा प्रकारचे करिअर निवडावे यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. दिलीप पवार यांनी विद्यार्थ्यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 20-20 ही यावर्षीपासून लागू केलेली आहे व त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे बदल झालेले आहेत आणि या अभ्यासक्रमामध्ये कशाप्रकारे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊन चांगल्या प्रकारे करिअर करता येईल याबद्दल महत्व पटवून दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दीक्षारंभ कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. यामध्ये विद्यापीठ परिसर भेट, महाविद्यालय भेट तसेच त्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग व विद्यार्थ्यासोबत संवाद या गोष्टीवर भर देऊन ते महाविद्यालयात या सर्व गोष्टी राबवीत आहेत व राहिलेल्या गोष्टी राबविल्या जातील याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले.
श्री.अरुण आनंदकर यांनी प्रथम वर्ष बीटेक विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना विद्यापीठाकडून सर्व प्रकारची मदत होईल तसेच त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याची खात्री दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील फुलसावंगे यांनी तर आभार स्वाती वरपे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.