चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाच्या पोलिसांनी फोडल्या काचा; नागरिक म्हणाले ‘योग्यच केले’
प्रसाद घोगरे | 9370328944 | Delhi 91 प्रतिनिधी | 11/03/2026
चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनाच्या पोलिसांनी फोडल्या काचा; नागरिक म्हणाले ‘योग्यच केले’
मढी यात्रेदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही वाहनांवर पोलिसांनी कडक कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने पोलिसांनी संबंधित वाहनांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान काही गाड्यांच्या काचा फोडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही वाहनचालकांनी वाहतूक नियम धाब्यावर बसवत चुकीच्या दिशेने येत रस्त्यावर डबल लाईन लावून समोरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांचा मार्ग पूर्णपणे अडवला होता. त्यामुळे रस्त्यावर मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाला आणि भाविकांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेत संबंधित वाहनांवर कारवाई केली. कारवाईदरम्यान काही वाहनांच्या काचा फोडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर अनेक नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईला समर्थन दिले आहे. यात्रेसारख्या मोठ्या कार्यक्रमात काही वाहनचालक नियम मोडून वाहतूक कोंडी करतात, त्यामुळे प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
काही नागरिकांनी प्रतिक्रिया देताना, “नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. काचा फोडल्या तर चुकीचे काही नाही, अशा वाहनचालकांना धडा मिळालाच पाहिजे,” असे मत व्यक्त केले.
यात्रेदरम्यान लाखो भाविक येत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे ही पोलिसांसमोरील मोठी जबाबदारी असते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.








