राहुरीतील तनपुरे वाडीत शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली*

राहुरीतील तनपुरे वाडीत शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली*

*राहुरीतील तनपुरे वाडीत शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान, नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली*

राहुरी शहरातील तनपुरे वाडी परिसरात दिनांक २८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सूर्यभान देवराव चौधरी यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे चौधरी कुटुंब घरात बसलेले असताना अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील मौल्यवान साहित्य जळून खाक झाले.

घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर वस्तीतील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. माजी नगरसेवक दिलिप चौधरी, नगरसेवक नंदू तनपुरे, उमेश शेळके, कैलास तनपुरे, आबा तनपुरे, राहुल तनपुरे, नंदू बोरसे, पाराजी चौधरी, अशोक गाडेकर यांच्यासह इतर नागरिकांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

विशेष म्हणजे, आगीची तीव्रता वाढत असताना सर्वप्रथम घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आला. त्यामुळे संभाव्य मोठा स्फोट टळला. त्यानंतर नागरिकांनी एकजुटीने आग विझवण्याची मोहीम हाती घेतली आणि अग्निशमन दल येण्यापूर्वीच आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच राहुरीचे ग्रामहसूल अधिकारी रवींद्र बाचकर साहेब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांनी चौधरी कुटुंबाची विचारपूस करत पुढील कार्यवाहीसंदर्भात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

या आगीच्या घटनेमुळे चौधरी कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. घरातील अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर मौल्यवान सामान जळून खाक झाले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या धाडसपूर्ण मदतीमुळे सुदैवाने जीवितहानी टळली. अन्यथा गॅस सिलेंडरमुळे मोठा स्फोट होऊन गंभीर दुर्घटना घडू शकली असती. या घटनेमुळे वस्तीतील नागरिकांनी दाखवलेल्या एकजुटीचे आणि धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे