वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याला बढती; शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याला बढती; शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अहिल्यानगर | प्रतिनिधी - प्रसाद घोगरे - 9370328944.
अरणगाव येथील मिठू कार्तिक दत्त मृत्यू प्रकरणात गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या एपीआय प्रल्हाद गीते यांना बढती मिळाल्याची माहिती समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. खून दडपण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असतानाही संबंधित अधिकाऱ्याला बढती देण्यात आल्याने शासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात मृत्यू संशयास्पद असताना देखील “अकस्मात मृत्यू” अशी नोंद करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच पुरावे नष्ट करणे, सीसीटीव्ही फुटेज हटविणे आणि मर्जीतील साक्षीदारांचे जबाब नोंदविणे यासारखे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. या सर्व बाबींवर तक्रारदाराने वरिष्ठ स्तरावर लेखी तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.
अशा परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्याला बढती मिळणे म्हणजे शासनाकडून अशा कृत्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जात आहे का, असा संतप्त सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
तक्रारदाराने या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर ठेवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर अद्याप शासन किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे या वादग्रस्त बढतीमागील नेमकी कारणे काय, याबाबत संभ्रम कायम आहे.
या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेवरील विश्वासाला तडा जात असल्याची भावना व्यक्त होत असून, आता शासन या मुद्द्यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








