कोपरगाव येथील डाळिंब व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेस भेटी व मार्गदर्शन.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत जि. अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यातील कोलपेवाडी, करवडी, माहेगांव देशमुख व काकडी या भागातील प्लॉटला विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या. या चमूमध्ये हॉर्टसॅप प्रकल्प प्रमूख डॉ.आण्णासाहेब नवले (विभाग प्रमूख, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग), डॉ. प्रकाश मोरे (अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीक योजनाचे कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ), डॉ. प्रवीण खैरे
(संशोधन सहयोगी, रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभाग) तसेच कृषी विभागातील पांडुरंग जाधव (मंडळ कृषी अधिकारी, कोळपेवाडी), सुनील घारकर (मंडळ कृषी अधिकारी, पोहेगाव), विशाल साबदे, (कृषी सहाय्यक, काकडी) तायडे मॅडम (कृषी सहायक, रांजणगाव देशमुख) हे उपस्थित होते. या भेटी दरम्यान शास्त्रज्ञ व अधिकार्यांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन डाळींब व टोमॅटो उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा केली आणि चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन डाळिंब व टोमॅटो पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन आणि अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना डाळिंब व टोमॅटो पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पाहणी केल्यानंतर या डाळिंब बागेमध्ये जीवानुजण्य तेल्या रोग, बुरशीजन्य ठिपके या रोग व थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव दिसला. तसेच टोमॅटो पिकामध्ये फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला, त्या अनुषंगाने किड एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन.सी.आय.पी.एम., न्यु दिल्ली या संकेत स्थळावर विद्यापीठा मार्फत सदर पिकासाठी पीक सरंक्षण सल्ला दिला जातो. भेटीवेळी शेतकऱ्यांना विद्यापीठा मार्फत तयार केलेल्या अडवायसरी देण्यात आल्या. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी डॉ. संजय कोळसे (प्रकल्प समन्वयक, हॉर्ट्सप) यांचे सहकार्य व डॉ.पी.जी.पाटील (कुलगुरू, म.फु.कृ.वि.राहुरी) यांचे मार्गदर्शन लाभले.