राहुरी कृषी विद्यापीठात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे .

राहुरी कृषी विद्यापीठात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे .

 आपल्या भारताला कृषि व ऋषीची परंपरा लाभली आहे. पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये ऋषी विद्यार्थ्यांना सर्व शाखा शिकवत असते. परंतु, आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये हे पहावयास मिळत नाही. आपल्या कृषि संस्थेमध्ये शेतकर्याला खरे द्रष्टेपण असते असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व अहिल्यानगर येथील सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी केले. 

 मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाकडून माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दि. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करणे व वाचनाची आवड वृद्धिंगत करणे हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. अनिल सहस्रबुद्धे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषिशास्त्र परिभाषा कोश (सुधारित) उपसमितीचे अध्यक्ष डॉ. भीमराव उल्मिक होते. याप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य श्री. जयंत येलुलकर, भाषा संचालनालयाचे सहाय्यक भाषा संचालक श्री. शरद यादव, पर्यवेक्षक श्री. संदीप साबळे व अनुवादक श्री. मुकुंद गोरे उपस्थित होते.

 डॉ. दिलीप पवार आपल्या भाषणात म्हणाले की भाषा केवळ मराठीच असायला पाहिजे असे नव्हे तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयातले वाचन करावे. मात्र वाचनाला विशेष महत्त्व यायला हवे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे प्रत्येक वर्षी मराठी वाङ्मयाची पुस्तके खरेदी करण्यावर भर देत असते. किमान 5000 रुपयांच्या पुस्तकाची खरेदी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन प्रेरणा जागृत व्हावी हा उद्देश असतो असे यावेळी डॉ. दिलीप पवार यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. भीमराव उल्मेक यांनी मराठी भाषेविषयी आपण सर्वांनी आस्था बाळगली पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा परिचय करून देणार्या काही उतार्यांचे तसेच अन्य पुस्तकातील उतार्यांचे अभिवाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील सावंगी यांनी केले या कार्यक्रमासाठी कृषि अभियांत्रिकी विद्यालयातील विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.