हाळगाव कृषि महविद्यालय हे कृषि शिक्षणाचे दीपस्तंभ ठरेल - माजी मंत्री आ . प्रा. राम शिंदे .

हाळगाव कृषि महविद्यालय हे कृषि शिक्षणाचे दीपस्तंभ ठरेल - माजी मंत्री आ . प्रा. राम शिंदे .

*हाळगाव कृषि महाविद्यालय हे कृषि शिक्षणाचे दीपस्तंभ ठरेल*

 *- माजी मंत्री आ . प्रा. राम शिंदे* 

*हाळगाव, दी.१३ ऑक्टोबर, २०२४*

            प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाची सुरुवात झाली. सध्याही येथील विद्यार्थ्यांसमोर काही आव्हाने उभे आहेत.या प्रतिकूल परिस्थितीवर जो मात करेल तोच यशाला गवसणी घालेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगाव भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कृषि शिक्षणाचे दीपस्तंभ आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र ठरेल असे प्रतिपादन माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी केले. 

          महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय हाळगाव तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कृषि परिषदेचे महासंचालक श्री रावसाहेब भागडे, अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, कृषिमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री पंडित खेडकर, विद्यापीठ अभियंता इंजी. मिलिंद ढोके, पद्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सात्ताप्पा खरबडे, हाळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे आणि प्रगतीशील शेतकरी तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

             प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले की कुलगुरू डॉ. पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा हे कृषि महाविद्यालय सुरू केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सध्याला या महाविद्यालयासाठी एककोटी लिटरचे शेततळे असून पुढे आपण अजून असेच दोन शेततळे तयार करणार आहोत. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी एक्सप्रेस फीडर लवकरात लवकर मंजूर होत आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा साठी रत्नापुर तलावातून पाईपलाईन चा प्रस्ताव मंजूर होत आहे त्यासाठी 15 कोटी आपण मंजूर करणार आहोत. तसेच भव्य सभागृहासाठी 20 कोटी ची मंजुरी शेवटच्या टप्प्यात आहे. खेळ, क्रीडा, जिमखाना यासाठी आपण पाच कोटी रुपयांची भरीव तरतूद करणार आहे.

        याप्रसंगी अध्यक्ष मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले कृषि महाविद्यालयातील शास्त्रज्ञ शिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांनासुद्धा पीक पद्धतीवर मार्गदर्शन करतील. शिक्षणाबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान देणे, पीक उत्पादन संदर्भातील समस्या सोडविणे हे एक उद्दिष्ट आहे. या परिसरातील शेतकऱ्यांसाठी या कृषि महाविद्यालयात आपण बियाणे विक्री केंद्र तसेच वेळोवेळी मार्गदर्शन मिळावे यासाठी कम्युनिटी रेडिओ आपण सुरू करणार आहोत. 

          यावेळी कुलगुरूंच्या हस्ते महाविद्यालयासाठी आपल्या जमिनीतून रस्ता देणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये शेतकरी सिताराम ढवळे, विश्वनाथ ढवळे, मारुती ढवळे, धनंजय ढवळे, सुभाष ढवळे, आबासाहेब ढवळे, बाबासाहेब ढवळे,संजय मोरे आणि दशरथ सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप पवार म्हणाले की या महाविद्यालयातून आजपर्यंत 200 विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली असून हे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांनी यावेळी या कृषि महाविद्यालयाची सद्यस्थितीची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे आणि कुलगुरू डॉ . पी.जी. पाटील यांच्या शुभहस्ते कृषि महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले तर आभार संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी मानले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील शेतकरी, विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.