*वांबोरीच्या कंपनी चालकाच्या हलगर्जी पनामुळे ३२ वर्षीय माळवदे नामक तरुणाचा मृत्यु*

*वांबोरीच्या कंपनी चालकाच्या हलगर्जी पनामुळे ३२ वर्षीय माळवदे नामक तरुणाचा मृत्यु*

राहुरी प्रतिनिधी,

कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका ३२ वर्षीय कामगाराचा यंत्रामध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना दि. २४ सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील बी ए बी एन या कंपनीमध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे. कामगाराचा मृतदेह तब्बल ६ तास यंत्रामध्ये अडकून राहिल्याने नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

          राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे राहुरी वांबोरी रस्त्यावर बीएबीएन हर्बल इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. भरत आसाराम माळवदे, वय ३२ वर्षे, रा. मोरेवाडी, वांबोरी, हा त्या कंपनीमध्ये कामगार होता. भरत माळवदे हा दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता कंपनीमध्ये कामाला गेला होता. कंपनीमध्ये कामकाज करत असताना भरत माळवदे हा कंपनीतील यंत्रामध्ये ओढला गेला व त्यातच तो जबर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तब्बल ६ तास मृतदेह यंत्रामध्ये अडकून होता. त्यामुळे नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ, पोलीस हवालदार संजय राठोड, राहुल झिने, सुनिल निकम आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

 

        त्यानंतर मृतदेहाला यंत्रामधून बाहेर काढून वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नंतर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. मयत भरत आसाराम माळवदे हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परीवार असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर कंपनी चालक हा अपघाती मृत्यु प्रकरण हे दाबादाबी करण्याच्या मागावर आहे तरी मा.पोलिस अधिक्षक व पोलिस महासंचालक नाशिक यांनी सदर अपघात / घातपात कंपनीच्या परवान्या पासून ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशि जनतेत कुजबुज होत आहे.