*विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतीचा वापर करावा.*
*राहुरी विद्यापीठ, दि. 6 मे, 2026*
विद्यापीठातील संशोधनाचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे. आगामी काळामध्ये शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामध्ये संतुलित खतांचा वापर महत्त्वाचा असून त्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यापीठ संतुलित खत वापर जागरूकता अभियान - 2026 राबवत आहे. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी शास्त्रज्ञांनी नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतीचा वापर करावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. धुळे येथील शासकीय कृषी महाविद्यालयाला भेटी प्रसंगी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. एम. इल्हे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, मुक्ताईनगर, जि. जळगाव येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, पशु विज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राहुल देसले, कृषी अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विश्वनाथ शिंदे व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिनेश नांद्रे उपस्थित होते.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास खर्चे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की हवामान अनुकूल शेती, नैसर्गिक शेतीचा प्रसार आणि एकात्मिक शेती पद्धतीवर आपण भर द्यायला हवा. ग्रामीण युवकांना शेतीकडे वळवण्यासाठी कृषी उद्योजकता विकास, शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक पाठबळ आणि फुले समृद्धी गाव संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी संतुलित खत वापर जागरूकता अभियान - 2026 या भितीपत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण शैक्षणिक, संशोधन तसेच विस्तार कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या विविध विभागात भेटी देऊन मार्गदर्शन केले. महाविद्यालयाबरोबरच बाजरी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र येथे भेट देऊन तेथील आढावा त्यांनी घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बी. एम. इल्हे यांनी प्रास्ताविक करून महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. डॉ. राहुल देसले यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक बाबींचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. जगदिश काथपुरी यांनी केले तर आभार डॉ. विकास पवार यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्रकल्प समन्वयक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.








