*महात्मा फुले कृषी विद्यापीठात विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक खरीप २०२६ संपन्न.*
*जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी संतुलीत खतांच्या वापराबरोबरच जैविक व सेंद्रिय खतांचा अंतर्भाव करणे गरजेचे*
*राहुरी विद्यापीठ, दि. 4 जून, 2026*
शेतीमध्ये वापरण्यात येणार्या निविष्ठांच्या किमती वाढलेल्या आहेत. रासायनीक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य खराब होत आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत चालली आहे. जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी व आरोग्य सुधारण्यासाठी संतुलीत खतांच्या वापराबरोबरच जैविक व सेंद्रिय खतांचा अंतर्भाव करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कृषि विद्यापीठ व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक खरीप 2026 चे आयोजन ऑनलाइन व ऑफलाईन करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. राहुल महिवाल, राज्याचे कृषि आयुक्त श्री. सुरज मांढरे व पशुसंवर्धन आयुक्त श्री. किरण पाटील, कृषि विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) श्री. रफिक नाईकवडी ऑनलाइन उपस्थित होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, डॉ. साताप्पा खरबडे व कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की येत्या खरीप हंगामात एल निनोच्या प्रभावाने कमी पाऊस झाला तर आपत्कालीन पीक नियोजन कसे करायचे यावर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेले तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने तयार केलेली आपत्कालीन पीक नियोजन ही पुस्तिका सर्व विस्तार कार्यकर्ते व शेतकर्यांपर्यंत पोहोचायला हवी. नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा निर्मितीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यात जून महिन्यामध्ये खेत बचाओ अभियान राबविण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सांगितले. यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत विविध विस्तार उपक्रमांच्या अहवालाचे सादरीकरण केले. डॉ. प्रशांत बोडके यांनी खरीप हंगामाचे नियोजन या विषयावर सादरीकरण केले. विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक श्री. रफिक नाईकवडी यांनी यावेळी कृषि विभाग शेतकर्यांसाठी राबवत असलेल्या विविध योजनांबाबत सादरीकरण केले. विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर श्री. अजय कुलकर्णी, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक श्री. सुभाष काटकर, विभागीय कृषि सहसंचालक, पुणे श्री. बाबासाहेब जेजुरकर यांनी याप्रसंगी विभागीय खरीप अहवाल व विद्यापीठ शिफारशी प्रत्याभरण यांचे सादरीकरण केले.
यावेळी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उत्तम कदम यांनी खरीप पिकांचे कीड व्यवस्थापन, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांनी खरीप कडधान्य पीक उत्पादन तंत्रज्ञान, पुणे येथील कृषि हवामान शास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा बगाडे यांनी खरीप हंगामाकरिता हवामान आधारित नियोजन, वरिष्ठ कापूस पैदासकार डॉ. पवन कुलवाल यांनी कापूस पीक उत्पादन तंत्रज्ञान, एकात्मिक शेती संशोधन प्रकल्पाचे कृषिविद्यावेत्ता डॉ. उल्हास सुर्वे यांनी नैसर्गिक शेती, डॉ. सुदर्शन लटके यांनी खरीप पिकांचे रोग व्यवस्थापन व विद्यापीठ विकसित नाविन्यपूर्ण उत्पादन फुले सुपर बायोमिक्स, अहिल्यानगर येथील महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सुनील दौंड यांनी बियाणे उपलब्धता, डॉ. तुकाराम भोर यांनी सुधारित भात पीक उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. सचिन महाजन यांनी खरीप सोयाबीन पीक उत्पादन तंत्रज्ञान या विषयांवर माहिती दिली. यावेळी तीनही विभागीय कृषि सहसंचालक यांनी आपल्या सादरीकरणामध्ये मांडलेल्या प्रत्याभरणाच्या विविध मुद्द्यांवर शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आपत्कालीन पीक नियोजन या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले. या बैठकीसाठी विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सहयोगी संशोधन संचालक, शास्त्रज्ञ तसेच दहा जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रांचे प्रमुख, जिल्हा विस्तार केंद्रे व विभागीय विस्तार केंद्र यांचे प्रमुख ऑफलाइन तसेच ऑनलाइन उपस्थित होते.








