कृषि विज्ञान केंद्रांनी विस्तार कार्यातून आपली ओळख निर्माण करावी - कुलगुरू डॉ. शरद गडाख .

कृषि विज्ञान केंद्रांनी विस्तार कार्यातून आपली ओळख निर्माण करावी - कुलगुरू डॉ. शरद गडाख .

*कृषि विज्ञान केंद्रांची कृती कार्यशाळा संपन्न*

*कृषि विज्ञान केंद्रांनी विस्तार कार्यातून आपली ओळख निर्माण करावी*

*- कुलगुरु डॉ. शरद गडाख*

        शेतकर्यांना शाश्वत उत्पादन मिळून त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे कृषि विज्ञान केंद्रांचे उद्दीष्ट्य असले पाहिजे. कृषि विद्यापीठाच्या विकसीत तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिक घेणे हे कृषि विज्ञान केंद्रांचे महत्वाचे कार्य आहे. पीक प्रात्यक्षिके, पीक संग्रहालय आणि आद्यरेखा प्रात्यक्षिके हे कृषि विज्ञान केंद्राचे शक्तीस्थान आहे. शेतकरीभिमुख विस्तार कार्य करुन कृषि विज्ञान केंद्रांनी आपली ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी केले.

           महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि कृषि तंत्रज्ञान अवलंबन संशोधन संस्था, विभाग-8, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 18 कृषि विज्ञान केंद्रांची दोन दिवसीय कृती कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कुलसचिव डॉ. नितिन दानवले व पुणे येथील कृषि तंत्रज्ञान अवलंबन संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शाकिर अली सैद उपस्थित होते. 

            यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे मार्गदर्शन करतांना म्हणाले की बदलत्या हवामानात तग धरणारे तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसीत केले असून त्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर कृषि विज्ञान केंद्रांनी करावा. कृती कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यापीठातील विविध पिकातील अद्ययावत संशोधन शेतकर्यांपयर्र्ंत पोहचवावे. कृषि विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांनी शेतकर्यांच्या समस्यांवर अभास करुन पीक पध्दतीचे नियोजन करावे असे यावेळी ते म्हणाले. डॉ. विठ्ठल शिर्के यावेळी म्हणाले की कृषि विज्ञान केंद्रांचा प्रत्येक कार्यक्रम हा शेतकरीभिमुख असावा. विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञान हे कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शेतकर्यांना पाहण्यासाठी ठेवावे. डॉ. शाकिर अली सैद म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विविध पिकांमध्ये संशोधन करुन शेतकर्यांसाठी मोठे योगदान दिले आहे. कृषि विज्ञान केंद्राने पीक उत्पादन तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण व मुल्यवर्धनावर भर द्यावा. कृषि विज्ञान केंद्रांचे 30 टक्केपर्यंत सर्व उपक्रम हे महिलांसाठी असावेत. प्रत्येक हंगामासाठी पीक संग्रहालय तयार करावे जेणेकरुन कृषि विज्ञान केंद्रास भेट देणारे शेतकरी ते तंत्रज्ञान बघतील व त्यांचा त्यावर विश्वास बसेल. 

          कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. भगवान देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील एकूण 18 कृषि विज्ञान केंद्रांचे प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत कृषि विज्ञान केंद्रांचा मागील वर्षाचा आढावा व पुढील वर्षाचे संशोधन व विस्ताराचे नियोजन निर्धारीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले तर आभार डॉ. सचिन सदाफळ यांनी मानले.