फुले कृषि प्रदर्शन व सावित्री जत्रेमुळे अंशमुक्त शेती उद्योजकतेला चालना मिळेल - कुलगुरू डॉ. शरद गडाख

*फुले कृषि प्रदर्शन व सावित्री जत्रेमुळे अंशमुक्त शेती उद्योजकतेला चालना मिळेल*
*कुलगुरू डॉ. शरद गडाख*
सन १९५० मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती व अन्नधान्याचे उत्पादन ५० मिलियन टन होते. फळे व भाजीपालाचे उत्पादन २३ मिलियन टन होते व दुधाचे उत्पादन १३ मिलियन टन होते. सध्याला आपली लोकसंख्या १४२ कोटी असून अन्नधान्याचे उत्पादन ३३१ मिलियन टन, फळे व भाजीपाल्याचे उत्पादन ३५१ मिलियन टन आणि दुधाचे उत्पादन २३१ मिलियन टन आहे. फळे व भाजीपाला उत्पादनामध्ये आपण जगात दुसरे असून दूध उत्पादनामध्ये आपण जगात पहिले आहोत. अन्नधान्य मध्ये आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत. याचे श्रेय शेतकरी, कृषि शास्त्रज्ञ व धोरण करते यांना जाते. आता ग्राहक जागरूक झाला आहे. ग्राहक अंशमुक्त उत्पादन मागत आहे. यामुळे अंश मुक्त उत्पादनाला बाजारपेठेत मागणी वाढत आहे. या फुले कृषि प्रदर्शन व सावित्री जत्रेमुळे अंशमुक्त शेतीची जनजागृती होणार आहे. यामुळे शेतकरी विद्यार्थी आणि समाजातील इतर घटकांना अंशमुक्त शेतीचे महत्त्व कळून त्याची मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत होऊन उद्योजकतेचे बीज रुजविले जाणार आहे. कृषि विद्यापीठ इथून पुढे विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करणार आहे. या अशा उपक्रमांमुळे उद्योजकतेला चालना मिळून विद्यार्थी नोकरी घेणारा ऐवजी नोकरी देणारा होणार आहे असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय पुणे, कृषि विभाग, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था, पुणे, जिल्हा परिषद पुणे आणि नॅकॉफ इंडिया लि. नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फुले कृषि - २०२५ व सावित्री जत्रा या शाश्वत शेती प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन कृषि महाविद्यालय पुणे येथे करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख बोलत होते.
या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी, स्मार्ट प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, कार्यकारी परिषद सदस्य डॉ. पी. जी. इंगोले व श्री संजीव भोर, अतिरिक्त महासंचालक यशदा तथा अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना श्री. शेखर गायकवाड, कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषि) डॉ. सताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कृषि महाविद्यालय पुणे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले, नॅकोफ नवी दिल्ली चे प्रतिनिधी श्री. गोविंद डाके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पुणे च्या प्रकल्प संचालीका श्रीमती शालिनी कडू उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत फुलकुंडवार मार्गदर्शन करताना म्हणाले, कृषि विद्यापीठातील तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहे. कृषि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शाश्वत शेती आणि अंशमुक्त अन्नधान्य उत्पादनाकडे जाणे गरजेचे आहे. शेती आणि शेतकरी यांचे आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकरी बांधवांचा विकास हाच आपला विकास आहे.
जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी म्हणाले, कृषीमध्ये अमर्यादित रासायनिक औषधांच्या वापरामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. यासाठी अंशमुक्त व सेंद्रिय शेती उत्पादनाची आता गरज वाढली आहे. सेंद्रिय उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध झाली तरच शेतकरी सेंद्रिय शेती करतील. सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत आहे. निर्यात क्षम कृषि उत्पादनासाठी आम्ही तीन वर्षाची रूपरेषा तयार करत आहोत. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲग्री हॅकॅथॉनचे आयोजन करणार आहोत.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले पुणे जिल्ह्यामध्ये २७ हजार बचत गट असून या बचतगटांना दोन लाख महिला जोडलेल्या आहेत. शेती कामामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. सेंद्रिय शेतीच्या उपक्रमांमध्ये ग्रामीण महिला व शेतकरी महिलांचा सहभाग घेतला तर सेंद्रिय शेतीला मोठी चालना मिळणार आहे. या फुले कृषी प्रदर्शन व सावित्री जत्रेला सर्वांनी भेट द्यावी असे त्यांनी यावेळी आव्हान केले. याप्रसंगी श्री. शेखर गायकवाड आणि श्री. गोविंद डाके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले आणि शिवार फेरी केली. या शिवार फेरीमध्ये ५० पेक्षा जास्त रेसिड्यू फ्री पिकांची प्रात्यक्षिके मान्यवरांनी पाहिले. या वेळी प्रदर्शनास भेट देतेवेळी त्यांनी कृषी उत्पादकांच्या स्टॉलला भेटी दिल्या आणि बचत गटांच्या महिलांबरोबर संवाद साधला.
या कार्यक्रमाला राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड, कृषी तंत्रज्ञान शिक्षणचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, उद्यान विद्या महाविद्यालय, पुणे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील, कृषि विद्यापीठांतील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी, प्रगतशील शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये स्मार्ट प्रकल्प, नैसर्गिक शेती मिशन , कृषि संसाधन निधी आणि माजी कृषि विद्यार्थी संघटना यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महानंद माने यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पल्लवी सुर्यवंशी यांनी केले तर आभार श्रीमती शालिनी कडू यांनी मानले.