महापारेषणच्या प्रशिक्षण परिपत्रकाचे सर्वांकडून स्वागत..!
महापारेषणच्या प्रशिक्षण परिपत्रकाचे सर्वांकडून स्वागत..!
मुंबई - महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण ही एक अति उच्च दाबाने विद्युत पारेषित करणारी अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.
ही कंपनी राज्यामध्ये दूरपर्यंत विद्युत पारेषण करण्याचे काम करते.
या कंपनीमध्ये वर्ग एक आणि वर्ग दोन पदांवर सुमारे पाच हजार अधिकारी कार्यरत आहेत. या संबंधित अधिकारी वर्गांना मानव संसाधन विभागाकडून वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.
महापारेषण कंपनीमध्ये विद्युत, स्थापत्य, संगणक, मानव संसाधन आणि वित्त विभाग यामध्ये ही सर्व अधिकारी मंडळी कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांना दैनंदिन कामाचे स्वरूप पाहून वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.
यापूर्वी प्रशासनाने जे विषय ठरवले आहे त्यामध्ये कर्मचारी वर्गांना वेळोवेळी पारंपरिक प्रशिक्षण दिले जात होते.परंतु आता कंपनीने प्रशिक्षण परिपत्रक दि.4 मे 2026 रोजी मानव संसाधन विभागाने जे निर्गमित केले आहे, त्यामध्ये आता थेट अधिकारी वर्गांकडून त्यांना कुठल्या विषयांमध्ये ट्रेनिंग हवे आहे. याची माहिती मागविली आहे. या परिपत्रकामुळे मानव संसाधन विभाग हा कर्मचारीभिमुख निर्णय घेत असल्याचे बोलले जात आहे. आपण कुठल्या क्षेत्रामध्ये कमी पडत आहोत आणि विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी भविष्यात कुठल्या बाबीचा सामना करताना आपल्याला कुठल्या प्रशिक्षणाची गरज आहे,याची कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फॉर्ममध्ये माहिती भरून दिल्यानंतर त्यांना त्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कुमार तसेच मानव संसाधन विभागाच्या कार्यकारी संचालक तथा अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती सुचिता भिकाने व मुख्य महाव्यवस्थापक श्री राजू गायकवाड यांनी घेतलेला आहे.या परिपत्रकामुळे फिल्ड वरील कर्मचारी व अधिकारी वर्गामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे
साधारणत: प्रशिक्षण हे कर्मचारी आणि संस्था दोघांसाठी अत्यंत फायदेशीर असते. या मानव संसाधन विभागाच्या स्तुत्य निर्णयामुळे आता अधिकारी वर्गाच्या उत्पादकता, कार्यक्षमतेत वाढ, कौशल्ये प्रभावीपणे सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षित कार्यपद्धती शिकवल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.
महापारेषण कंपनीचे प्रशासन फिल्ड वरील अधिकाऱ्यांना ज्या क्षेत्रात प्रशिक्षण हवे आहे,ज्या क्षेत्रात आपण कमी पडत आहोत असे वाटले तर ,त्याच क्षेत्रात त्यांना प्रशिक्षण देऊन कौशल्य गुण वृद्धिंगत करण्यास प्रशासन मदत करत आहे.
त्याबद्दल अनेक संघटना पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी वर्ग आभार व्यक्त करत आहे. असेच अनेक सकारात्मक धोरणात्मक निर्णय महापारेषण च्या प्रशासनाने घ्यावे.असे मत फिल्ड वरून व्यक्त केले जात आहे.
महापारेषण कंपनीचा मानव संसाधन विभागाचा कार्यभार श्रीमती सुचिता भिकाने यांच्याकडे मागील वर्षापासून आल्यापासून त्यांनी अनेक निर्णय धडाडीने घेण्याचा व तो पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले जात आहे.तसेच मानव संसाधन विभागाचे मुख्य महा व्यवस्थापक श्री राजू गायकवाड यांनी कर्मचारी वर्गास कुठल्याही तांत्रिक गोष्टीचा, अडचणींचा सामना करावा लागत असेल तर आम्ही त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी वेळोवेळी उपलब्ध आहोत असेच हे परिपत्रक निर्गमित करून दाखवून दिले आहे.








