सोनईत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : २२५ विविध दाखल्यांचे वाटप; शेतकऱ्यांना ३ ट्रॅक्टर अवजारे वितमरित
: सोनईत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
: २२५ विविध दाखल्यांचे वाटप; शेतकऱ्यांना ३ ट्रॅक्टर अवजारे वितमरित
अहिल्यानगर|// प्रतिनिधी//
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला सोनई येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी (दि.१५) सकाळी १० वाजता सोनई येथील विश्वलक्ष्मी मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थानी नेवासा तहसीलदार डॉ. संजय बिरादार उपस्थित होते.
या शिबिरात महसूल विभागाच्या विविध १५ सेवांअंतर्गत २२५ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना कृषी उपयोगासाठी तीन ट्रॅक्टर व अवजारांचेही वितरण करण्यात आले. विविध शासकीय सेवा नागरिकांपर्यंत सुलभ आणि जलद पद्धतीने पोहोचविण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नेवासा तालुक्याच्या विकासासाठी विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तालुक्यातील विकासाचा बँकलॉग भरून काढण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.नेवासा तालुक्याचा सुमारे ५१ टक्के भाग मुळा धरणाच्या पाण्याचा लाभ घेत असल्याने पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील वादग्रस्त रस्त्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर असून प्रशासनाने ते प्राधान्याने सोडवावेत, अशा सूचना त्यांनी तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांना दिल्या.
शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्या व तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर सुरू केले असल्याचेही आमदार लंघे यांनी सांगितले. नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घेऊन आपले प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
सोनई मंडळाचे मंडळाधिकारी प्रशांत कांबळे यांनी शिबिरातील कामकाजाची माहिती देताना महसूल विभागांतर्गत विविध प्रकारचे सुमारे २२५ दाखले वाटप करण्यात आल्याचे सांगितले. तसेच घोडेगाव येथे नव्याने रुजू झालेल्या अप्पर तहसीलदार सोनाली मात्रे यांचा आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी तहसीलदार डॉ. संजय बिरादार, अप्पर तहसीलदार सोनाली मात्रे, पुरवठा अधिकारी सुदर्शन दुर्योधन, दुय्यम निबंधक पवार, मंडळ कृषी अधिकारी बबन कराड, सहायक कृषी अधिकारी स्नेहल आत्राम, विद्या काळे, वैशाली काकडे, आरोग्य अधिकारी डॉ. क्षितिजा इंगळे, डॉ. पुनम भुसारी, मंडळाधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी गणेश आगळे, पोलीस पाटील सयाराम बानकर, अरुण दरंदले यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








