डॉ. एम.एस. स्वामिनाथन म्हणजे विज्ञान, राष्ट्रसेवा आणि शेतकऱ्यांप्रती निष्ठा यांचे मुर्तीमंत उदाहरण - अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे
डॉ. एम.एस. स्वामिनाथन म्हणजे विज्ञान, राष्ट्रसेवा आणि शेतकऱ्यांप्रती निष्ठा यांचे मुर्तीमंत उदाहरण- अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे
डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांनी केलेल्या संशोधनाचा गाभा अन्नधान्य उत्पादन वाढविणे हाच राहिला. त्यांनी संशोधीत केलेल्या गहू आणि तांदळाच्या उच्च उत्पादक वाणांमुळे देशात अन्नधान्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन भारत अन्नधान्यात आत्मनिर्भर झाला. ज्यामुळे देशात हरित क्रांतीचा उदय झाला. डॉ. स्वामिनाथन यांच्या कार्यामुळे केवळ उत्पादन वाढले नाही तर त्यांनी शेतीच्या शाश्वततेवर भर देवून शाश्वत शेती या संकल्पनेचा पुरस्कार केला. डॉ. स्वामिनाथन यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे विज्ञान, राष्ट्रसेवा आणि शेतकर्यांप्रती निष्ठा यांचे मुर्तीमंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
कृषी क्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धेचा शुभारंभप्रसंगी द्रोणागिरी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. सुनील भनगे, क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही.बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी.बी बाचकर, डॉ. व्हि.डी. वाळे आदींसह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
डॉ. साताप्पा खरबडे पुढे म्हणाले की डॉ. स्वामिनाथन यांचे संशोधन केवळ प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता थेट शेतकर्यांच्या आयुष्यात उपयोगी पडले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाने कमी काळामध्ये अत्यंत चांगले काम केले असून कृषी विद्यापीठ कायम या महाविद्यालयाच्या पाठीशी आहे. प्रत्येकासाठी व्यायाम आणि खेळ महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये न अडकता खेळ खेळलेच पाहिजे असे यावेळी ते म्हणाले. यावेळी डॉ. सुधीर तांबे व डॉ. सुनील भणगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आयोजीत केलेल्या या आंतरविभागीय टेबल टेनिस व बॅडमिंटन स्पर्धेत कोल्हापूर ते नंदुरबार या 9 जिल्ह्यातील 550 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार प्रा. जी.बी. बाचकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच टीम मॅनेजर व शिक्षक उपस्थित होते.








