प्रा. डॉ. चांगदेव वायळ हे जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचे मुर्तीमंत उदाहरण - डॉ. प्रशांत बोडके

प्रा. डॉ. चांगदेव वायळ हे जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचे मुर्तीमंत उदाहरण - डॉ. प्रशांत बोडके

प्रा.डॉ.चांगदेव वायळ हे जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचे मुर्तीमंत उदाहरण  - *डॉ प्रशांत बोडके

 

      डोंगराळ व दुर्गम भागातील गांव आणि घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची व हालाखीची असताना देखील केवळ जिद्द, चिकाटी, संघर्ष व आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी पडेल ते काम करण्याची असलेली तयारी आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामांमुळेच आज प्रा.डॉ.चांगदेव वायळ यांना सहयोगी प्राध्यापक किटकशास्र या पदावर पदोन्नती (प्रमोशन) मिळालेली आहे असे प्रदिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रशांत बोडके यांनी केले. 

      प्रा.डॉ.चांगदेव वायळ हे कडधान्य सुधार प्रकल्प येथे सहाय्यक प्राध्यापक होते. त्यांची कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक या पदावर पदोन्नती झाल्यामुळे कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी, राहुरी या कार्यालयाने त्यांचा निरोप समारंभ आयोजीत केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना डॉ प्रशांत बोडके बोलत होते.

          कडधान्य सुधार प्रकल्प या कार्यालयाचे प्रमुख आणि या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुरेश दोडके म्हणाले की तुमच्या चांगल्या कामामुळे जर संस्थेची प्रगती होत असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील, त्यांच्या पिकांचे चांगले उत्पन्न वाढत असेल आणि शेतकऱ्यांना जर चांगला फायदा होत असेल तर त्या संस्थेच्या जडणघडणीत तुमचे नाव असे कोरले जाते की नंतर ते कुणीच पुसू शकत नाही.

          यावेळी डॉ.सोमनाथ धोंडे म्हणाले की डॉ.चांगदेव वायळ हे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू व अभ्यासू आहेत. जेष्ठ अभिनेते आमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कपच्या ऑनलाईन डिजिटल शेती शाळेमधून ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तूर,मूग,उडीद,मका व हरभरा या पिकांवरील एकात्मिक कीड व्यवस्थापनावर मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना जवळून ओळखतात आणि त्यांच्या कार्याचा आदर व सन्मान करतात.

         याप्रसंगी दै.सामना, दै.दिव्य मराठी आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाडेकर म्हणाले की प्रा.डॉ.चांगदेव वायळ यांचे कृषी विद्यापीठात जसे चांगले काम आहे. तसेच ते त्यांच्या स्वतःच्या कोळेवाडी, ता.राहुरी या गावामध्ये सुद्धा मोठे समाजकार्य करत आहे. त्यांनी कोळेवाडीमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आणि वाचनालय स्वतःच्या पैशाने सुरु केलेले आहे. इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या गावात गावाकऱ्यांच्या सहकार्याने व शासनाच्या योजनेतून पाणी अडवणे व पाणी जिरण्यासाठी पाच सिमेंट बंधारे बांधलेले असून दोन पाझर तलाव देखील दुरुस्त केलेले आहेत. त्यांच्या या लोकाभिमुख कार्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटलेला आहे.

          यावेळी कोळेवाडीचे ज्येष्ठ नागरिक आणि छत्रपती शिवाजी टर्मिनल, मुंबई मध्ये सेंट्रल रेल्वे मध्ये नोकरी केलेल्या जयराम नंदकर यांनी सांगितले की चांगदेव वायळची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. सन 1990 साली चांगदेव हा बी.एस्सी.(अग्री) शिकण्यासाठी कोल्हापूरला गेलेला आहे असे जेंव्हा मला समजले तेंव्हा मी लगेच पत्र पाठवून चांगदेवचे अभिनंदन केले आणि त्याला लगेच मी मनीऑर्डरने पैसे पाठवून धिर दिला की गरिबीमुळे आणि पैश्याच्या अडचणीमुळे तू शिक्षण अर्धवट सोडू नकोस. तुला शिक्षणासाठी लागतील तेवढे पैसे मी मनीऑर्डरने पाठवून देत जाईल. आणि त्यानुसार मी चांगदेवला पैसे पाठवले देखील. जयराम नंदकर पुढे म्हणाले की चांगदेवची पदोन्नती (प्रमोशन) झाल्याबद्दल मलाच नाहीतर आमच्या कोळेवाडी गावातील सर्वच नागरिकांना खूप खूप आनंद झालेला आहे.यावेळी डॉ विश्वास चव्हाण, हेमलता वायळ, निर्मला गाडे व कमल वायळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

          या कार्यक्रमाला डॉ सचिन सदाफळ, डॉ सुदर्शन लटके, डॉ विवेक शिंदे, डॉ संदिप लांडगे, डॉ लक्षीमण तागड, डॉ रमेश ब्राहमने,उद्धव पालवे, दिलीप कल्हापुरे, रावसाहेब कांबळे, शंकर लेंभे व कडधान्य सुधार प्रकल्पातील सर्व कर्मचारी व मजूर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ महेश भारती यांनी केले तर आभार रविंद्र आंधळे यांनी मानले.