अतिवृष्टी झाल्याने देव नदीला महापूर,पिंप्री अवघड येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने आपत्तीग्रस्तांना जि. प . प्राथमिक शाळेत केले स्थलांतरित .

अतिवृष्टी झाल्याने देव नदीला महापूर,पिंप्री अवघड येथील अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने   आपत्तीग्रस्तांना जि. प . प्राथमिक शाळेत केले स्थलांतरित .

राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे देव नदीला महापूर आल्याने अनेक घरांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने देवनदीला महापूर आला असून रात्रीच्या वेळी अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठी असलेल्या अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी प्रशासन व गावातील तरुण सहकार्य करत आहेत . सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गावातील अनिल गायकवाड व बाबू माळी यांनी आपल्या साधनातून बाधीत कुटूंबाचे घरातील साहित्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोहचविण्याचे काम केले आहे .

 

        गावातील महापुराची परिस्थिती पाहता शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर जवरे यांनी शाळेच्या खोल्या आपत्तीग्रस्थांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत . शाळेचे शिक्षक अनिल पवार, मच्छिंद्र नागटिळक व शिवाजी कुलट हे गावाच्या मदतीसाठी शाळेत आले असून मदतकार्य करत आहेत .

 

       *हे.कॉ. अर्जून दारकुंडे व भाऊसाहेब शिरसाठ यांनी केली पाहणी*

               राहुरी पोलिस स्टेशनचे हे .कॉ. अर्जून दारकुंडे व भाऊसाहेब शिरसाठ यांनी बाधित कुटूंबाची भेट घेऊन सर्वांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबावे अशा सुचना दिल्या आहेत .

 

          *कर्तव्यदक्ष तलाठी*

   

              पिंप्री अवघडचे कर्तव्यदक्ष तलाठी तुषार काळे यांनी पुरपरिस्थितीची पाहणी करून स्थलांतरीत कुटूंबाना भेटी देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या . सरकारी काम करत असतांना व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी गावातील तरुणांबरोबर बाधीत कुटूंबांना जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून पाच हजार रुपयांची मदत करून प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे .

 

        *मदत कार्यासाठी गावातील तरुण अग्रेसर*

 

        पूराचे पाणी ज्या ज्या घरात शिरले तेथिल नागरिकांना सहकार्य करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, दिपक बर्डे, भैय्या पठाण, विजय गायकवाड ,शाम माळी, किशोर जाधव यांनी अनेक तरुणांना सोबत घेत मदतकार्य सुरू केले . पुराचे पाणी घरामध्ये शिरलेल्या 27 कुटूंबांतील लहान मोठे अशा 147 जणांचा समावेश आहे . भुकेने व्याकूळ झालेल्या या कुटूंबांना तात्काळ जेवणाचीही व्यवस्था या तरुणांनी केली आहे .

 

     *प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांची पुरग्रस्तांना मदत*

 

        प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांनी पशासकिय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन घटनास्थळाची पाहणी केली . दरवर्षी नदीच्या पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या त्रासातून कायमची सुटका व्हावी व या नागरिकांना हक्काची जागा तसेच घर मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे .

 

*स्वस्त धान्य दुकानातून धान्याची मदत*

   

       गावातील स्वस्त धान्य दुकान चालक गोपिनाथ शेंडे यांनी प्रशासनाच्या परवानगीने पुरग्रस्तांना 50kg धान्य दिले आहे . शासन व गावकरी सर्वतोपरी सहकार्य करत असल्याने पूरग्रस्त कुटूंबातील नागरिकांनी सर्वांचे आभार मानले आहे .