लोणी येथे सर्वसामान्यांवर RTO ची कारवाई, वाळू - मुरूम माफियांकडे दुर्लक्ष ?

लोणी येथे सर्वसामान्यांवर RTO ची कारवाई, वाळू - मुरूम माफियांकडे दुर्लक्ष ?

लोणी येथे सर्वसामान्यांवर RTO ची कारवाई; वाळू–मुरूम माफियांकडे दुर्लक्ष?

 

          लोणी परिसरात दर आठवड्याला भरणाऱ्या बाजारासाठी शेतकरी, छोटे व्यापारी व हातावर पोट असलेले नागरिक आपल्या जनावरांसह व मालासह वाहनांद्वारे बाजारात येत असतात. मात्र याच सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवर श्रीरामपूर आरटीओकडून सातत्याने कडक कारवाई करत हजारो रुपयांचे दंड आकारले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर लोणी–नांदूर शिंगोटे रोडवरील एक हृदयद्रावक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.लोणी बैल बाजारासमोर जनावरे वाहतूक करणारा एक गरीब चालक रडत उभा असल्याचे दृश्य सामाजिक कार्यकर्ते प्रसाद घोगरे व सागर राक्षे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी थांबून विचारणा केली असता, त्या चालकाने व्यक्त केलेली व्यथा माणुसकीला काळीज पिळवटून टाकणारी होती.

 

           सदर चालक आपल्या छोटा हत्ती वाहनातून दोन जनावरे घेऊन उपजीविकेसाठी बैल बाजारात येत असताना, आरटीओ अधिकाऱ्यांनी त्याचे वाहन अडवले व “नंबर प्लेट चुकीची आहे” असे सांगून ५,००० रुपयांचा दंड ठोठावला. चालकाने हात जोडून विनवणी करत सांगितले की,“साहेब, माझी परिस्थिती नाही… माझ्या पायात चप्पलसुद्धा नाही. आज नाष्टा देखील केलेला नाही. दुपारी पैसे आल्यावर नाष्टा करणार आहे अशी माझी परिस्थिती आहे, तर मी ५,००० रुपये कुठून आणू?”

 

           एवढं सांगून देखील त्याच काही एक न ऐकता थेट दंड करण्यात आला. उपाशी पोटी, हताश अवस्थेत, बाजारात जनावरे विकायची आशा मोडून, तो चालक माणुसकी हरवलेल्या व्यवस्थेचा बळी ठरला आणि त्यामुळेच तो रडत असल्याचे दिसून आले.

 

           या घटनेनंतर माणुसकीच्या नात्याने सामाजिक कार्यकर्ते प्रसाद घोगरे, सागर राक्षे व शेतकरी यांनी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना जाब विचारला.“कायदा सर्वांसाठी समान आहे याबाबत दुमत नाही. पण कायद्यापेक्षा माणुसकी मोठी नाही का? अधिकारी म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून विचार करता येणार नाही का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

              दरम्यान, नागरिकांचा आरोप आहे की, याच रस्त्यांवरून खुलेआम अवैध वाळू व मुरूम वाहतूक, तसेच ऊस वाहणारी ओव्हरलोड ट्रॅक्टर व ट्रक वाहने निर्धास्तपणे धावत असताना त्यांच्यावर मात्र अपेक्षित ती कारवाई होत नाही. त्यामुळे “कायद्यासमोर सर्व समान असताना कारवाई फक्त गरीब व लहान वाहनधारकांवरच का?” असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे.

 

         RTO चे ‘जादूचे कार्ड’ – कारवाईपासून सुटका?नाव न छापण्याच्या अटीवर काही वाहनचालकांनी असा धक्कादायक आरोप केला आहे की, ठराविक रक्कम घेतल्यावर काही वाहनधारकांना सांकेतिक ‘कार्ड’ दिले जाते. सदर कार्ड असलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. इतकेच नव्हे, तर त्या कार्डची वैधता तपासण्यासाठी स्वतंत्र ॲप असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.