मधमाशीपालन हे ग्रामीण अर्थकारणाला बळ देणारे प्रभावी माध्यम - डॉ. यु. बी. होले

मधमाशीपालन हे ग्रामीण अर्थकारणाला बळ देणारे प्रभावी माध्यम - डॉ. यु. बी. होले

“मधमाशीपालन हे ग्रामीण अर्थकारणाला बळ देणारे प्रभावी माध्यम” - डॉ. यु. बी. होले 

नंदुरबार : 

           महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे जागतिक मधमाशी दिनानिमित्त २० मे २०२६ रोजी एकदिवसीय “शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यक्रम” उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमास विद्यार्थी, कृषीप्रेमी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. एस. एस. वाघ व डॉ. के. व्ही. देशमुख यांनी केले, तर सहसंयोजन डॉ. डी. बी. सूर्यवंशी यांनी केले.

          प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. डी. बी. सूर्यवंशी यांनी केले. प्रथम सत्रात डॉ. पी. एन. जोगदंडे यांनी मधमाश्यांचे परागीभवनातील महत्त्व स्पष्ट करून शेती उत्पादनवाढीतील त्यांचे योगदान अधोरेखित केले. डॉ. एस. एस. वाघ यांनी मधमाश्यांचे रोग व त्यांचे नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. “मधमाश्यांचे संवर्धन ही काळाची गरज” या विषयावर डॉ. के. व्ही. देशमुख यांनी पर्यावरण संरक्षण, अन्नसुरक्षा व शाश्वत शेतीमध्ये मधमाश्यांची भूमिका स्पष्ट केली.

          दुपारच्या सत्रात डॉ. यु. बी. होले यांनी “मानवी जीवनातील मधमाश्यांचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन करताना मध, मेण, रॉयल जेली यांसारख्या उत्पादनांचे आर्थिक व औषधी महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी मधमाशीपालन हा ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त व कमी खर्चातील व्यवसाय असल्याचे नमूद केले. तसेच शेती उत्पादनवाढ, पर्यावरण संतुलन आणि शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उत्पन्नासाठी मधमाश्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ग्रामीण युवकांनी मधमाशीपालनाकडे स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

           शेवटच्या सत्रात डॉ. के. व्ही. देशमुख व श्री प्रसाद गांगुर्डे यांनी मधमाशीपालनाचे प्रात्यक्षिक सादर केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री. विशाल जाधव, श्री. खोंडे व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन व सहकार्य केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कार्यतत्परतेचे व शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले.