*खतांचा संतुलित वापर जागरूकता अभियान 2026 अंतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन* *
*खतांचा संतुलित वापर जागरूकता अभियान 2026 अंतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन*
*राहुरी विद्यापीठ, दि. 20 मे, 2026*
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांमध्ये खतांचा संतुलित वापर याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील मृदाशास्त्र विभाग व आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागामार्फत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील, मृदशास्त्रज्ञ डॉ. आनंद जाधव, डॉ. सुभाष घोडके, डॉ. गणेश शेळके, जलसिंचन आणि निचरा अभियंता डॉ. देविदास खेडकर व कृषि अधिकारी श्रीमती पौर्णिमा गाढे उपस्थित होते.
यावेळी डॉ. भीमराव कांबळे यांनी आगामी खरीप हंगामात युरिया व इतर रासायनिक खतांना पर्यायी उपाय काय करता येतील याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विजयकुमार पाटील यांनी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. डॉ. आनंद जाधव यांनी माती परीक्षण अहवालाधारित आणि अपेक्षित पीक उत्पादन सूत्रांच्या आधारे शेतकर्यांनी विविध पिकांसाठी खतांच्या मात्रा कशा द्याव्यात याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सुभाष घोडके यांनी ऊस पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना ऊस पिकासाठी खतांचे वेळापत्रक, सरळ रासायनिक खते उपलब्ध नसल्यास पर्यायी संयुक्त खते कोणती वापरावीत, रासायनिक खतांचा वापर कमी करून अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी कंपोस्ट खते, हिरवळीचे खते, जिवाणू खाते इत्यादी खतांचा एकात्मिक वापर करून अपेक्षित उत्पादन कसे घ्यावे याबाबत मार्गदर्शन केले. पढेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. शंकरराव चौधरी यांनी विद्यापीठाचे अपेक्षित उत्पादन आधारित खतमात्रा व्यवस्थापन याबाबत त्यांनी स्वतःच्या शेतावर घेतलेल्या गहू ऊस पिकावरील यशस्वी उत्पादनाचे अनुभव यावेळी सांगितले. सहाय्यक कृषि अधिकारी श्री. आदिनाथ धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. श्री. गोरक्षनाथ बडदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. शुभांगी कदम, कृषि सहाय्यक श्री. शेषराव देशमुख, कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती जे. एन. वाडेकर, श्रीमती सी.एस. क्षीरसागर तसेच प्रगतशील शेतकरी श्री. योगेश शहाणे, श्री. किशोर कुर्हे, श्री. दादासाहेब कुताळ, श्री. शिवाजी कोरे, श्री. राधाकिसन राजूळे, श्री. विनय भगत, श्री. ज्ञानदेव भगत व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
राहुरी तालुका प्रतिनिधी डॉ देवेंद्र शिंदे









