फुले समृद्ध गाव तांभेरे येथे पद्मश्री डॉ .विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकरी दिन उत्साहात साजरा

फुले समृद्ध गाव तांभेरे येथे पद्मश्री डॉ .विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकरी दिन उत्साहात साजरा

*फुले समृद्ध गाव तांभेरे येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकरी दिन उत्साहात साजरा*

*तंत्रज्ञानाच्या वापराने आपले गाव समृद्ध करा**- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे*

       सहकाराचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकाराचे बीज रोवून शेतकरी वर्गासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे गावांचा व त्याअनुषंगाने देशाचा विकास झाला. त्याप्रमाणेच फुले समृद्ध गाव म्हणून निवड झालेल्या तांभेरे गावाचा विकास राहुरी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाच्या वापराने होईल. यासाठी कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबरोबरच शासनाच्या कृषीसह सर्व विभागांची मदत होणार आहे. शेतकर्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब व त्याच्या प्रभावी प्रसारासाठी निश्चय करावा. सर्व शेतकरी बांधवांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपले गाव समृद्ध करावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

         कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भाकृअप शेतकरी प्रथम कार्यक्रमांतर्गत आणि फुले समृद्ध गाव उपक्रमांतर्गत तांभेरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ शेतकरी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. याप्रसंगी तांभेरे गावचे सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र निमसे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ प्रा. अन्सार खान व प्रगतशील शेतकरी श्री. उत्तम मुसमाडे उपस्थित होते.

       यावेळी डॉ. रवींद्र निमसे यांनी शेळी तसेच मेंढीपालनातील पंचसूत्री या विषयातील शेळी, मेंढी यांचे खाद्य व्यवस्थापन, लसीकरण नियोजन, आजार व त्यावरील उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. उमेश मुसमाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सेंद्रिय शेती करणारे श्री. ऋत्विक गागरे व उत्कृष्ठ शेळीपालन करणार्या सौ. कीर्ती गागरे यांचा मान्यवरांच्या हस्ते कृषिदर्शनी व मफुकृवि कॅलेंडर देवून सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सुरू केलेला उपक्रम फुले कृषी तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ देणारा ठरला. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन शेतकरी प्रथम प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री. विजय शेडगे यांनी तर आभार श्री. सुनील राजमाने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तांभेरे गावातील मेजर ताराचंद गागरे, यशवंत मुसमाडे यांच्यासह इतर शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रक्षेत्र सहाय्यक श्री. राहुल कोर्हाळे व श्री. किरण मगर यांनी परिश्रम घेतले.