आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी आणि जैन इरिगेशन ,जळगाव यांच्यात सामंजस्य करार

आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी आणि जैन इरिगेशन ,जळगाव यांच्यात सामंजस्य करार

*आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि जैन इरिगेशन, जळगाव यांच्यात सामंजस्य करार*

 संशोधन, शिक्षण, विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधन क्षमतांना चालना देण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगांव यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली व जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री अजित जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. काटेकोर शेती, स्वयंचलित सिंचन प्रणाली आणि डिजिटल शेती या क्षेत्रांत संयुक्त संशोधन व संस्थात्मक सहकार्य वाढविणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

 याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अनिल ढाके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्या केल्या. या प्रसंगी अखिल भारतीय समन्वित जलसिंचन व पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे डॉ. अभय पाटील, डॉ. प्रमोद पोपळे, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील आणि डॉ. बाळकृष्णन तसेच कृषि संशोधन केंद्र, जळगाव येथील तीळ पैदासकार डॉ. सुमेरसिंग राजपूत हे उपस्थिती होते.

 या करारांतर्गत आधुनिक सूक्ष्म सिंचन, सिंचनाचे स्वयंचलित प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काटेकोर सिंचन, सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा कार्यक्षम वापर आणि भूपृष्ठाखालील ठिबक सिंचन या विषयांवर संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विविध प्रमुख पिकांसाठी सिंचनाचे वेळापत्रक, पाण्याचा काटेकोर वापर, सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यासंबंधी पीकनिहाय प्रमाणित कार्यपद्धती विकसित करण्यात येतील. त्यामध्ये ड्रोनद्वारे फवारणी, इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी सेन्सर्स आणि उपग्रह प्रतिमांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही या करारात भर देण्यात आला आहे. विद्यापीठातील कृषि व कृषि अभियांत्रिकी शाखांच्या पदवी विद्यार्थ्यांना जैन इरिगेशनच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये आणि संशोधन प्रक्षेत्रांवर प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच कृषि क्षेत्रातील महत्त्वाच्या समस्यांवर संशोधन करणाऱ्या निवडक पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा संशोधन साहित्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. या सहकार्यामुळे आधुनिक सिंचन व डिजिटल शेतीतील संशोधनाला गती मिळून विद्यार्थ्यांचे कौशल्यवर्धन आणि संशोधनाधारित तंत्रज्ञानाच्या प्रसाराला चालना मिळणार आहे.