मढी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला काळाचा घाला ; तिघांचा मृयु तर एकजण बचावला
मढी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला काळाचा घाला; तिघांचा मृत्यू, एकजण बचावला
घोडेगाव-सोनई रस्त्यावरील मुळा पाटबंधारे कालव्याच्या पुलावर भीषण दुर्घटना; क्रेनच्या साहाय्याने वाहन बाहेर काढले
: मढी येथे दर्शनासाठी आलेल्या सिन्नर तालुक्यातही कासारवाडी येथील भाविकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट मुळा पाटबंधारे विभागाच्या कालव्यात कोसळली. घोडेगाव-सोनई रस्त्यावरील शनेश्वर दूध संघाजवळ असलेल्या कालव्याच्या पुलावर बुधवारी ही भीषण दुर्घटना घडली. कालव्यात पाणी सुरू असल्याने कारमधील तिघांचा मृत्यू झाला, तर एकजण सुदैवाने बचावला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कार (क्रमांक MH 03 BW 7884) मढी येथे दर्शनासाठी जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलावरून थेट कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत रणधीर भाऊसाहेब, केरू जगताप आणि सुभाष बिडवे यांचा मृत्यू झाला. या तिघांची पूर्ण नावे व अन्य तपशील मिळू शकले नाहीत. संदीप सदाशिव कदम हा या अपघातातून बचावला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव सहायक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते पो. कॉ सुनील पालवे वजीर शेख कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. क्रेनच्या साहाय्याने कालव्यातील कार बाहेर काढण्यात आली. मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथे पाठविण्यात आले.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.








