नाथ प्रतिष्ठानच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात संजली परदेशी ठरल्या ई - बाईकच्या मानकरी .

नाथ प्रतिष्ठानच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात संजली परदेशी ठरल्या ई - बाईकच्या मानकरी .

नाथ प्रतिष्ठानच्या ‘होम मिनिस्टर’चा राहुरीत जल्लोष; संजली परदेशींनी पटकावली ई-बाईक 

 

 

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या स्पर्धेत सौ. संजली परदेशी यांनी प्रथम क्रमांक पटकावत ई-बाईकचे पारितोषिक मिळविले. द्वितीय क्रमांक सौ. सप्रे यांनी पटकावत एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांक अर्चना धाडगे यांनी पटकावत इलेक्ट्रिक शेगडी, तर चतुर्थ क्रमांक राधिका खुळे यांनी पटकावत मिक्सरचे पारितोषिक मिळविले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.

 

 

 

राहुरी शहरातील विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध सिनेअभिनेते ओम यादव यांच्या दमदार आणि मिश्कील सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. तब्बल चार तास रंगलेल्या या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

 

 

 

नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सौरभ उंडे यांनी सांगितले की, नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील प्रत्येक घटकाला आनंद, सहभाग आणि आपलेपणाची अनुभूती देणारा उत्सव व्हावा, हा नाथ प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. महिलांना त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांमधून काही क्षण बाहेर पडून आनंद घेता यावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी ‘होम मिनिस्टर’सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

 

 

 

नाथ प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना सौरभ उंडे यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, सर्वरोग निदान शिबिरे तसेच गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यासारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. सामाजिक सलोखा, माणुसकी आणि एकोप्याची भावना जपत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे.

 

 

 

ओम यादव यांच्या विनोदी शैलीतील संवाद, प्रश्नोत्तरे आणि विविध खेळांमुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमामुळे विद्या मंदिर प्रशालेचे प्रांगण जल्लोषाने दुमदुमून गेले.

 

 

 

कार्यक्रमाला अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी पहाटे दीड वाजता उपस्थिती लावली. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ उंडे यांनी खासदार लंके यांचे स्वागत केले. मध्यरात्रीनंतरही कार्यक्रमाचा उत्साह कायम राहिला. अखेर पहाटे दोन वाजता विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

 

 

 

यावेळी साई आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष शिवाजी कपाळे, संजीव उदावंत, नितीन काशिद, भारत भुजाडी, सचिन राऊत, मंदार धुमाळ, सचिन उंडे, लक्ष्मीकांत तनपुरे, वैभव धुमाळ, रामकृष्ण ढोकेणे, प्रसाद डाहळे, गोरक्षनाथ अडसुरे, गणेश खैरे, रितेश चौरसिया, सुवर्णा धनवटे, मुकुंद डहाळे, अक्षय उंडे, ओंकार कासार, प्रवीण ठोकळे, संदीप रासकर तसेच नाथ प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.

 

 

 

नाथ प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे महिलांना मनोरंजनासोबतच आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम राहुरीतील नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला.