राहुरी खुर्द येथील बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

राहुरी खुर्द येथील बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

राहुरी प्रतिनिधी,

राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथून पाच दिवसा पूर्वी एक विवाहित तरुण अचानकपणे बेपत्ता झाला होता. आज दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास सदर तरुणाचा मृतदेह राहुरी खुर्द येथील एका मंदिरा मागील काटेरी झुडपामध्ये सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

         शंकर छबु बर्डे, वय ४१ वर्षे, हा विवाहित तरुण त्याच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे राहत होता. पाच दिवसांपूर्वी तो घरातून अचानकपणे बेपत्ता झाला होता. या बाबत त्याचा भाऊ विजय छबू बर्डे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली होती. पोलिस पथकाकडून त्याचा शोध सुरु असताना आज दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी शंकर बर्डे याचा मृतदेह राहुरी खुर्द येथील शाळेमागील मंदिराच्या लगत असलेल्या काटेरी झाडा झुडपामध्ये सडलेल्या अवस्थेत मिळून आला. मृतदेह पूर्णपणे सडल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. यावेळी घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन दारकुंडे यांनी घटनास्थळी हजर राहुन माहिती घेतली. तसेच नातेवाईकांचे जबाब घेऊन पुढील तपास सुरु केला. मृतदेह झाडा झुडपात असल्याने जेसीबीच्या सहाय्याने झाडे झूडपे काढुन मृतदेह ताब्यात घेतला.

        शंकर बर्डे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. तो जुना बस स्थानक या परिसरात एका दुकानांमध्ये मजुरीचे काम करत होता. त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला. या बाबत परिसरात उलट सुलट चर्चा सूरु आहे. या घटनेचा तपास पोलिस पथकाकडून सुरु आहे. मात्र या घटनेमुळे राहुरी खुर्द परिसरात चांगलीच खळबळ उडाली.