श्री साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी उतरला डोक्यावरील गाठीचा डोंगर!
श्री साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी उतरला डोक्यावरील गाठीचा डोंगर!
शिर्डी | प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चत्तरी येथील २१ वर्षीय अनिकेत भानुदास इंगळे या तरुणाच्या डोक्यावर जन्मतःच एक छोटीशी गाठ होती. मात्र, काळाच्या ओघात ही गाठ वाढत जाऊन तब्बल ४.९ किलो वजनाची झाली आणि डोक्यावर गाठीचा जणू डोंगरच उभा राहिला.
ही गाठ इतकी मोठी होती की ती दूरूनही सहज दिसत होती आणि त्यामुळे रुग्णाच्या सामाजिक, मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत होते. अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये त्यांनी उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र गाठ डोक्यावर असल्याने कोणतेही रुग्णालय शस्त्रक्रिया करण्यास धजावत नव्हते. संभाव्य धोका लक्षात घेता डॉक्टरांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता.
अखेर अखेरच्या आशेने अनिकेतने श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी येथे धाव घेतली. येथे दाखल झाल्यानंतर डॉ. अजिंक्य पानगव्हाणे यांनी रुग्णाची सखोल वैद्यकीय तपासणी करून ही धोकादायक पण अत्यंत आवश्यक शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला. रुग्ण आणि कुटुंबीयांनीही संभाव्य धोका स्वीकारत शस्त्रक्रियेस संमती दिली.
दिनांक २५ जून २०२५ रोजी डॉ. अजिंक्य पानगव्हाणे, भूलतज्ञ डॉ. निहार जोशी आणि त्यांच्या अनुभवी शस्त्रक्रिया टीमने श्रीमंती, काटेकोर नियोजन, व धैर्याने ही जटिल शस्त्रक्रिया पार पाडली. ३० x २.५ सेमी आकाराची आणि तब्बल ४.९ किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या एका वेळेस काढण्यात आली. रुग्णाचे प्राण वाचवत, कोणताही धोका न होता ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
ही अशा प्रकारची दुर्मिळ, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच यशस्वीरित्या पार पडली असून, या यशाचे सर्व श्रेय डॉक्टरांच्या चिकाटी, कौशल्य व सेवाभावी दृष्टिकोनाला जाते, असे मत डॉ. पानगव्हाणे यांनी व्यक्त केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से), उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक (से.नि.), उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, न्युरोसर्जन डॉ. मुकुंद चौधरी, जनसंपर्क अधिकारी श्री. सुरेश टोलमारे यांनी डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व त्यांच्या टीमचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
या शस्त्रक्रियेची विशेष बाब म्हणजे, संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया मोफत स्वरूपात करण्यात आली, हे ही नमूद करण्याजोगे आहे. यामुळे रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.
"श्री साईबाबा हॉस्पिटल हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, आरोग्यसेवेतही खऱ्या अर्थाने चमत्कार घडवणारे ठरत आहे," असा विश्वास रुग्णाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.









