हॉटेल मालक व कस्टमर यांच्यात जेवणाचे बिल देण्यावरून वाद

हॉटेल मालक व कस्टमर  यांच्यात जेवणाचे बिल देण्यावरून वाद

जेवण झाल्यावर बील देण्यासाठी पैसे नव्हते म्हणून हॉटेल मालकाकडे मोबाईल ठेवला. दोन दिवसा नंतर आरोपी आले आणि हॉटेल मालकाला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच कत्तीने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना राहुरी शहर हद्दीतील एका हॉटेलमध्ये दि. २२ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 

राहुरी ता प्रतिनिधी - देवेंद्र शिंदे

        नितीन भाऊसाहेब फुलसौंदर, वय ३५ वर्षे, हे राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड परिसरात राहत असून त्यांचे शहरातील भारत नगर येथे हॉटेल नंदिनी नावाचे व्हेज व नॉनव्हेज हॉटेल आहे. दि. १९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दोन आरोपी हॉटेल नंदिनी येथे गेले आणि जेवण केले. जेवण केल्यानंतर आरोपी आकाश माळी हा नितीन फुलसौंदर यांना म्हणाला की, माझ्याकडे बिल देण्यासाठी आत्ता पैसे नाहीत. मी नंतर पैसे देतो, असे म्हणुन त्याने ३०० रुपए उसने मागीतले. तसेच जेवणाचे बिल नंतर देतो, तोपर्यंत माझा मोबाईल तुमच्याकडे ठेवतो. मी बिलाचे पैसे दिल्यावर माझा मोबाईल परत मागे दया. असे म्हणुन आरोपी तेथुन निघुन गेले. त्यानंतर दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजे दरम्यान आरोपी पून्हा हॉटेल नंदिनी येथे गेले. आणि नितीन फुलसौंदर यांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर कत्तीने वार करण्याचा प्रयत्न केला व बूक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. आणि नितीन फुलसौंदर यांना कत्तीने जिवे मारुन टाकतो, अशी धमकी दिली. तसेच हॉटेलच्या गल्ल्यामधील ५ हजार ५०० रुपए रोख रक्कम व सीसीटिव्ही कॅमेर्‍याचा डिव्हीआर असा एकूण ८ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेले. 

       घटने नंतर नितीन भाऊसाहेब फुलसौंदर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी आकाश माळी, रा. सरकारी दवाखाना समोर, भिलहाटी, राहुरी व एक अनोळखी तरुण अशा दोन जणांवर गुन्हा रजि. नं. २५८/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३०३ (२), ३२४ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.