शिर्डीत परिवर्तनाच्या विराट नावाची जोरदार चर्चा, भावना व्यक्त करणारे पत्र देत शिर्डीकरांना एकवटण्याची साद.
शिर्डीत परिवर्तनाच्या विराट नावाची जोरदार चर्चा, भावना व्यक्त करणारे पत्र देत शिर्डीकरांना एकवटण्याची साद.
प्रतिनिधी // प्रसाद घोगरे : ९३७०३२८९४४.
शिर्डी │ “परिवर्तनाची वेळ आता आली आहे... शिर्डीकरांनी एकत्र येऊन आपल्या शहराच्या भवितव्यासाठी सज्ज व्हावे!” — अशा प्रभावी शब्दांत शिर्डीतील ज्येष्ठ समाजसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुजी पुरोहित यांनी शिर्डीत परिवर्तनाचा एल्गार पुकारला आहे. भावनांनी ओथंबलेल्या पत्राद्वारे त्यांनी शिर्डीकरांना एकवटण्याचे आवाहन केले आहे.
राजकारण, समाजकारण आणि संघटन या तीनही आघाड्यांवर गेली चार दशके न थकता कार्यरत असलेले बाबुजी पुरोहित हे नाव शिर्डीत जनतेच्या संघर्षाशी घट्ट जोडले गेले आहे. एम.ए. (राज्यशास्त्र) आणि डिप्लोमा इन जर्नालिझम पुणे विद्यापीठातून पूर्ण केलेल्या पुरोहित यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी विद्यार्थिदशेत झालेल्या संपर्कातून सुरू झाला.
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, गिरीश बापट यांच्यासारख्या दिग्गजांसोबत कार्य करताना त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे रुजवली. शिर्डीत येऊन त्यांनी पक्षाचे काम स्वतःच्या जीवाच्या आणि कुटुंबाच्या जीवाच्या आहुतीवर सुरू ठेवले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, तसेच महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या जनसंघ ग्रामपंचायतीचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख झाली.
लोकशाही रक्षणासाठी आणीबाणी काळात दीड वर्षाचा तुरुंगवास भोगलेले पुरोहित यांनी सामान्य माणसाच्या स्वावलंबनासाठी दुकानदारांचा संघर्ष उभा केला, तर साखर कामगार, लघु व्यावसायिक आणि झोपडपट्टीतील गरीबांसाठी लढा दिला. शिर्डीतील लक्ष्मीनगर पुनर्वसन, सावळीविहीर साखर कामगार न्यायलढा, आणि 2004 च्या दंगल प्रकरणात प्रशासनाच्या दडपशाहीला न घाबरता दिलेला सामना ही त्यांच्या संघर्षाची पानं आजही जिवंत आहेत.
गोळीबार, लाठीचार्ज आणि खोट्या गुन्ह्यांचा सामना करत शिर्डीकरांच्या हितासाठी तुरुंगवास भोगणारे पुरोहित शेवटी निर्दोष सुटले, आणि न्याय मिळवला. “शिर्डीत संघ आणि भाजप म्हटले की पहिलं नाव येतं ते बाबुजी पुरोहितांचं,” असं म्हणणे स्थानिकांमध्ये ऐकायला मिळतं.
त्यांचे सुपुत्र विराट पुरोहित हेही संघपरंपरेत वाढलेले, शिस्तप्रिय आणि राष्ट्राभिमानी युवक आहेत. एमएससी (डिफेन्स स्टडी) पूर्ण केलेल्या विराट यांनी भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक येथे शिक्षण घेतलं असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. शरीरसौष्ठव क्षेत्रात त्यांनी ज्युनिअर ओपन नाशिक श्री तसेच दोन वेळा महाराष्ट्र प्रतिनिधित्व करून सिद्धता दाखवली आहे.
आज शिर्डीतून पुन्हा एकदा परिवर्तनाची गुढी उभारली जात आहे. बाबुजी पुरोहितांचा हा एल्गार शिर्डीच्या सामाजिक व राजकीय वातावरणात नव्या युगाची चाहूल देतो आहे.
“जनतेचा आवाज एकत्र आला, की परिवर्तन अटळ ठरतं,” असं सांगत पुरोहित यांनी शिर्डीकरांना एकतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश दिला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.









