श्री . आनंदराव पाटील व श्री . सतीश नेने हे आहेत ऑगस्ट महिन्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आयडॉल्स .
*श्री. आनंदराव पाटील व श्री. सतीश नेने हे आहेत ऑगस्ट महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल्स*
*राहुरी विद्यापीठ, दि. 1 ऑगस्ट, 2023*
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरु झालेला आहे. ऑगस्ट महिन्यातील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन श्री. आनंदराव पाटील व कृषि उद्योजक आयडॉल म्हणुन श्री. सतीश नेने यांची निवड झालेली आहे. श्री. आनंदराव पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असून कृषि पदवीधर श्री. सतीश नेने हे मु.पो. पढेगाव, ता.कोपरगाव, जि. अहमदनगर येथील कृषि उद्योजक आहेत.
शेतकरी आयडॉल श्री. आनंदराव पाटील हे मु.पो. कोथळी, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील शेतकरी असुन त्यांनी आपल्या शेतात पीक विविधतेबरोबर मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मधुमक्षिकापालन यासारखे शेती निगडित व्यवसाय यशस्वीरित्या केले आहेत. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषि विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पीक वाणांचा वापर, एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब आपल्या शेतात केला आहे. याशिवाय त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.
पुणे कृषि महाविद्यालयाचे कृषि पदवीधर आयडॉल कृषि उद्योजक श्री. सतीश वामन नेने हे मु.पो. पढेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर यांनी नेने फार्म, अर्णव आयुर्वेद, अंजली फ्रुट अँड व्हेजिटेबल कॅनिंग अँड ट्रेडिंग सेंटर यासारख्या उद्योगांची उभारणी केली. आपल्या उद्योगामधून फळांचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढविणारे उत्पादने याबरोबरच जनावरांसाठी विविध उत्पादनांची निर्मिती केली. यामध्ये जनावरांच्या लम्पी रोगावर हर्बल पावडर तयार करुन पशुपालकांना मोठा दिलासा त्यांनी दिला आहे. आंबा, केळी व पपई या फळपिकांना नैसर्गिक पध्दतीने पिकविण्यासाठी हर्बल पावडरची निर्मिती करण्यामध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यांनी इतरांना देखील व्यावसायीक मार्गदर्शन करून शेतातील कोणतीही गोष्ट वाया जाऊ न देणे व त्यांचे मूल्यवर्धन करणे यासाठी ते सदैव मदत करतात. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येतात.