महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन ..
*राहुरी विद्यापीठ, दि. 14 जून, 2023*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत जि. अहमदनगर येथील राहुरी तालुक्यातील काळे आखाडा या गावातील ११ प्लॉटला विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या. या चमूमध्ये डॉ. प्रकाश मोरे (अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीक योजनाचे कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ) हॉर्टसॅप प्रकल्पातील संशोधन सहयोगी डॉ. प्रविण बाबासाहेब खैरे व राहुरी तालुका कृषि सहाय्यक श्री. चंद्रकांत म्हसे व वैशाली देंडगे व त्यांच्या विभागाचे कृषि अधिकारी यांचा समावेश होता. या भेटी दरम्यान शास्त्रज्ञ व अधिकार्यांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन डाळींब उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा केली आणि चर्चेदरम्यान शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन डाळिंब पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन आणि अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. सध्या शेतकर्यांच्या डाळींब पिकावर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये तेलकट डाग या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. त्या अनुषंगाने किड व रोगाच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन.सी.आय.पी.एम., न्यु दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पीकसरंक्षण सल्ला दिला जातो. सदर प्रक्षेत्र भेटीसाठी डॉ. अण्णासाहेब नवले (विभाग प्रमुख, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अणुजीवशास्त्र विभाग) आणि डॉ. संजय कोळसे, सहयोगी प्राध्यापक तथा हॉर्टसॅप प्रकल्प समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभले.