महात्मा महात्मा फुले कृषी विद्यापीठातील एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाला पीक विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प मंजूर .
महात्मा फुले कृषी विद्यापिठातील घडामोडींचा Delhi91 news चा खास वृत्तांत .
*महात्मा फुले कृषि विद्यापीठातील एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाला पीक विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प मंजुर*
*राहुरी विद्यापीठ, दि. 20 ऑक्टोबर, 2023*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे एकात्मिक शेती पध्दती प्रकल्प कार्यरत आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या उत्तरप्रदेशातील मोदीपूरम येथील भारतीय शेती प्रणाली संस्थेने पीक विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प राबविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठातील एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाची निवड केली आहे. भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे देशातील विविध राज्यातील 75 जिल्ह्यात सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षांकरीता पीक विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणार्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकर्यांच्या 100 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प पुढील पाच वर्षांसाठी राबविला जाणार आहे.
यामध्ये बदलत्या हवामानानुसार व जमिनीचे आरोग्य अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विविध पीक पध्दतींचा अवलंब करणे आणि त्या अनुशंगाने सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार व अधिकाधिक उत्पन्न घेण्याबरोबरच जमिनीची सुपीकता ठिकविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. या प्रकल्पामध्ये शेतकर्यांना पेरणीसाठी बियाणे, बिजप्रक्रियेसाठी जिवाणूखते आणि जैविक बुरशीनाशके, कीटकनाशके देण्यात येणार असून विविध पिकांच्या लागवडीविषयी तज्ञ शास्त्रज्ञांचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सहभागी शेतकरी, कृषि विभागातील कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषि निविष्ठा पुरवठादार यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजीत करण्याचे प्रयोजन आहे. या प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक म्हणुन एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाचे प्रमुख कृषि विद्यावेत्ता डॉ. उल्हास सुर्वे तसेच उपमुख्य अन्वेषक म्हणुन मृदशास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ ताकटे, कृषि विद्यावेत्ता डॉ. नितीन उगले, कृषि अर्थशास्त्रज्ञ डॉ. संजय सपकाळ हे काम पाहणार आहेत. सदरचा प्रकल्प मंजुरीसाठी व शेतकर्यांच्या शेतावर राबविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे तसेच संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कृषिविद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के व नियंत्रक श्री. सदाशीव पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.