शेतीबरोबरच मानवी जीवन सुरक्षित करणे हे मोठे आव्हान -अर्थतज्ञ प्रा. एच . एम . देसरडा
*शेतीबरोबरच मानवी जीवन सुरक्षीत करणे हे मोठे आव्हान*
*अर्थतज्ञ प्रा. एच.एम. देसरडा*
*राहुरी विद्यापीठ, दि. 28 डिसेंबर, 2023*
भविष्यात आपल्या देशाची वाढती लोकसंख्या विचारात घेता हवामान बदलाचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम आपल्याला परवडणारा नाही. हरितगृह वायुचे मोठ्या प्रमाणावर होणारे उर्त्सजन हवामान वाढीसाठी कारण ठरत आहे. यावर उपाये म्हणजे सार्वजनीक वाहतूक व्यवस्थेचा सर्वांनी वापर करणे, त्याचबरोबर शेतीमध्ये गांडूळ व मधमाशांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करुन शेतीक्षेत्र वाचविणे ही काळाची गरज आहे. सध्याची परिस्थिती पाहता शेतीबरोबरच मानवी जीवन सुरक्षीत करणे हे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन अयोगाचे माजी सदस्य तसेच ख्यातनाम अर्थतज्ञ प्रा. एच.एम. देसरडा यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे प्रा. एच.एम. देसरडा यांनी विद्यापीठाच्या विविध संशोधन प्रकल्पांना भेट दिली. महात्मा फुले कृषि विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील सभागृहामध्ये भारतीय शेती समोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, अर्थशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. गोविंद जोशी उपस्थित होते.
यावेळी प्रा. देसरडा आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आज संपूर्ण जगासमोर हवामान बदलाचे सर्वात मोठे आव्हान आहे. या हवामान बदलावर येणार्या पिढीचे भविष्य अवलंबून आहे. सध्या वाहन उद्योगाबरोबरच औद्योगीक क्षेत्रात होत असलेला विकासामुळे पाणी आणि हवा मोठ्या प्रमाणावर प्रदुषीत झाले असून याला विकास म्हणता येणार नाही. भारतातील जैव विविधता ही आपल्या जीवनाचे सार आहे. ती आपण जपली पाहिजे. यासाठी पाणी व हवामान यावर आधारीत योग्य पीक पध्दती विकसीत करुन त्याची अंमलबजावणी कठोरपणे करावी लागेल. भारत 22 कोटी टन दुध उत्पादन करुन जगात एक नंबरवर असतांना 40 टक्के बालके कुपोषीत असणे, पाणी व हवेच्या गुणवत्तेमध्ये जागतीक स्तरावरील यादीत तळाच्या क्रमांकावर असणे हे चांगले लक्षण नसल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. रोहित निरगुडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कृषि अर्थशास्त्र विभाग, विस्तार विभागातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.