व्यापाऱ्याच्या गल्ल्यातील रोख रक्कम चोरी करणारे व घरपोडी करणारे 2 सराईत आरोपी .2,60,000/- रु . मुद्देमालासहित स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद, 3 गुन्हे उघड .
अहमदनगर शहरातील व्यापा-याचे गल्ल्यातील रोख रक्कम चोरी करणारे व घरफोडी करणारे 2 सराईत आरोपी 2,60,000/- रुपयाचे मुद्देमालासह जेरबंद 3 गुन्हे उघड, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी गुलाब पांडुरंग कराळे वय 68, धंदा कॉन्ट्रॅक्टर रा. वाकोडी, ता. नगर यांचे ऑफिसमध्ये लॉक असलेल्या ड्रॉव्हरमधील 3,00,000/- रुपये रोख रक्कम कोणीतरी अनोळखी चोरट्याने चोरुन नेले बाबत तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 34/2024 भादविक 454, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नोव्हेंबर 2023 मध्ये दिवाळी सणाचे कालावधीत अहमदनगर शहरातील व्यापारी फिर्यादी श्री. दिपक टेकचंद आहुजा यांचे दुकानातील 2,00,000/- रुपये रोख रक्कम 1 अनोळखी इसमाचे गल्ल्यात हात घालुन चोरुन नेली होती. व फिर्यादी विकी श्रीचंद हरदवाणी हे दुकानातील रोख रक्कम बॅगेत ठेवुन घराचे गेट जवळ उभे असताना अनोळखी 2 आरोपींनी 50,000/- रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावुन घेवुन गेले होते. सदर दोन्ही घटने नंतर व्यापारी वर्ग व नागरीकांमध्ये घबराटीचे व भितीचे वातावरण निर्माण झाल्याने, मा. आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना नमुद गुन्हे उघडकिस न आल्यास पोलीस प्रशासना विरुध्द उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिल्याने पोलीस दलासमोर गुन्हे उघडकिस आणण्याचे आव्हाण निर्माण झाले होते.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन राकेश ओला , पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पो.नि. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पो.नि. दिनेश आहेर यांनी दिनांक 10/01/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, पोकॉ/अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशांचे पथक नेमुन गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पो.नि.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हे हे आरोपी नामे विठ्ठल घोडके व सचिन घोडके रा. घोसपुरी, ता. नगर यांनी केला असुन ते गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम घेवुन स्प्लेंडर मोटार सायकलवर बाहेरगांवी जाणार असुन अहमदनगर शहरात येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो.नि . दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास देवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथकाने लागलीच हॉटेल सोनाली, नगर दौंड रोड येथे सापळा लावुन थांबलेले असताना दोन संशयीत इसम स्प्लेंडर मोटार सायकलवर येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच ते पोलीस पथकास पाहुन पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन दोन्ही संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) विठ्ठल संजय घोडके वय 24 व 2) सचिन सुभाष घोडके वय 33 दोन्ही रा. घोसपुरी, ता. नगर असे असल्याचे सांगितले.
त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 1,60,000/- रुपये रोख रक्कम मिळुन आली त्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी दिनांक 08/01/24 रोजी दिल्ली गेट येथील ऑफिसमधील रोख रक्कम तसेच दिवाळीचे काळात अहमदनगर शहरातील व्यापा-याचे गल्ल्यातुन व एका इसमाचे गाडीचे हॉडेलला लावलेली पैशाची बॅग चोरी केलेली रक्कम असले बाबत कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींकडे अधिक चौकशी करता त्यांनी काही रक्कम घरात ठेवली असल्याचे सांगितल्याने आरोपी नामे विठ्ठल घोडके याचे घरातुन 40,000/- व सचिन घोडके याचे घरातुन 10,000/- रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
ताब्यातील आरोपींना विश्वासात घेवुन अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे चोरी केली आहे या बाबत विचारपुस केली असता आरोपींनी दिवाळीचे कालावधीत चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता 03 गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नामे विठ्ठल संजय घोडके हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द चोरीचे 05 गुन्हे दाखल आहेत .
ताब्यातील दोन्ही आरोपींना 210000/- रोख रक्कम व 50000/- रुपये किंमतीची स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण 2,60,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,प्रशांत खैरे , अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. हरीष खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.