*राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे डाळिंब पिकावर मार्गदर्शन*

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व वनस्पती रोगशास्त्र व कृषि अनुजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग राबविण्यात येणार्या हॉर्टसॅप प्रकल्पामार्फत अहिल्यानगर जिल्ह्यातील काळे आखाडा (ता. राहुरी) येथे डाळिंब पीक रोग संकेत पातळीच्या वर गेलेल्या बागेला विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भेटी दिल्या. या चमूमध्ये अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके योजनेचे कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अनुजीवशास्त्र विभागातील हॉर्टसॅप प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे, तालुका कृषि अधिकारी श्री. बापुसाहेब शिंदे, मंडल कृषि अधिकारी श्री. अशोक गिरगुणे व कृषि सहाय्यक श्री. म्हस्के उपस्थित होते.

या भेटी दरम्यान शास्त्रज्ञांनी शेतकर्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन डाळींब उत्पादक शेतकर्यांबरोबर सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान शास्त्रज्ञांनी शेतकर्यांच्या शंकांचे निरसन करुन डाळिंब पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन आणि अधिक उत्पादनासाठी सविस्तर मार्गदर्शन व घडीपत्रिकांचे वाटप केले. डाळिंब बागेची पाहणी केल्यानंतर या बागेमध्ये बुरशीजन्य ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव दिसला. त्या अनुषंगाने किड एकात्मिक नियंत्रणासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकर्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या गावांसाठी हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत वेळोवेळी एन. पी. एस. एस., न्यु दिल्ली या संकेतस्थळावर विद्यापीठामार्फत सदर पिकासाठी पीकसरंक्षण सल्ला दिला जातो. सदर प्रक्षेत्र भेटीचे वनस्पती रोगशास्त्र व कृषि अनुजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक व हॉर्टसॅप प्रकल्पाचे समन्वयक डॉ. संजय कोळसे यांनी नियोजन केले.








