नागालँड राज्यात होणार सोयाबिनच्या फुले किमया वाणाचे बिजोत्पादन - कुलगुरु डॉ . पी . जी . पाटील

नागालँड राज्यात होणार सोयाबिनच्या फुले  किमया वाणाचे बिजोत्पादन - कुलगुरु डॉ . पी . जी . पाटील

*सोयाबीनचे फुले किमया वाणाचे बिजोत्पादन नागालँड राज्यात होणार*

*- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील*

*राहुरी विद्यापीठ, दि. 15 फेब्रुवारी, 2024*

            महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेला सोयाबीनचा फुले किमया या वाणाचे 17.16 क्वि. मुलभुत बियाणे नागालँड कृषि विद्यापीठाने पुढील बिजोत्पादन साखळीसाठी खरेदी केले आहे. नागालँड कृषि विद्यापीठाद्वारे आदिवासी उपयोजनेतंर्गत फुले किमया या वाणाचे वाटप होणार आहे. 

              महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पिकाचे क्षेत्र वेगाने वाढत आहे. सन 1990-91 मध्ये 2 लाख हेक्टर क्षेत्रावर असणारे सोयाबीन 2022-23 मध्ये 49.09 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने संशोधीत व विकसीत केलेल्या सोयाबीनच्या फुले किमयाचे 1850, फुले संगमचे 1575, फुले दुर्वाचे 565 व फुले कल्याणीचे 50 क्वि. पैदासकार बियाणे खरीप 2023 मध्ये उत्पादित केले आहे. हे बियाणे खरीप 2024 साठी वेगवेगळया शासकिय संस्था (महाबीज, राष्ट्रीय बीज निगम), शेतकरी गट/बिजोत्पादक कंपन्या, खाजगी बिजोत्पादक कंपन्यांना स्त्रोत बियाणे म्हणून विक्री करण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्यांना बिजोत्पादक साखळीमधून गुणवत्तापुर्ण बियाणे पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे. सोयाबीनचा फुले किमया या वाणास नागालँड येथील शेतकर्यांची मागणी वाढली असल्याने हे बियाणे नागालँड कृषि विद्यापीठाने खरेदी केले आहे.

 

             महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जिल्हा सांगली येथे सोयाबीन पिकाचा तांबेरा प्रतिकारक्षम वाण निर्मितीसाठी संशोधन कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यातून फुले किमया (केडीएस-753) हा वाण संशोधीत झाल्यानंतर तो दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांसाठी सन 2020 मध्ये शिफारशीत आणि अधिसूचित केला गेला. हा वाण महाराष्ट्र राज्याव्यतीरिक्त इतर राज्यांमध्ये शेतकर्यांच्या पसंतीस उतरला आहे. विद्यापीठाने विकसीत केलेल्या सोयाबीनचे वाण मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेत आहेत. शेतकर्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या बिजोत्पादन साखळी निर्मितीसाठी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली हा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.